मालेगावी करोना बळींची संख्या ६३ वर; २४ तासांत ६ रुग्ण पॉझिटिव्ह
स्थानिक बातम्या

मालेगावी करोना बळींची संख्या ६३ वर; २४ तासांत ६ रुग्ण पॉझिटिव्ह

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मालेगाव | प्रतिनिधी

करोनाचा उद्रेक नियंत्रणात येण्याची चिन्हे अद्याप दिसत नसून गेल्या 24 तासांत 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहर परिसरात बाधित रुग्णांची संख्या 840 वर पोहोचली आहे.

दरम्यान, येथील फरान रुग्णालयात बाधित 62 वर्षीय महिलेचा उपचार होत असताना आज मृत्यू झाल्याने करोना बळींची संख्या 63 वर पोहोचली आहे.

करोना सदृश्य लक्षणे दिसत असलेले पंधरा संशयित रुग्ण आज उपचार केंद्रात दाखल झाले. आज दुपारी प्राप्त अहवालात येथील दीड वर्षीय बालिका पॉझिटिव्ह आढळून आल्याने मालेगावकरांना धक्का बसला आहे.

संगमेश्वर महादेव मंदिर परिसरातील 84 वर्षीय वृद्ध तसेच पाट किनारा, हनुमान मंदिर , व सर्वे नंबर 55 येथील तिघा युवकांचा अहवाल पॉझिटिव आला आहे.

काल रात्री उशिरा शहरालगत असलेल्या वडगाव येथील इंदिरानगर भागातील 85 वर्षीय वृद्ध पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

द्याने पाठोपाठ वडगावात देखील करोना चा शिरकाव झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार करोना मुक्त झालेल्या 9 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com