मालेगाव : महिनाभरापासून कामावर हजर नसल्याने डॉक्टर, कनिष्ठ अभियंत्यासह १४ सेवकांविरोधात गुन्हा

मालेगाव : महिनाभरापासून कामावर हजर नसल्याने डॉक्टर, कनिष्ठ अभियंत्यासह १४ सेवकांविरोधात गुन्हा

मालेगाव | प्रतिनिधी

शहरात झालेला करोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी मनपा यंत्रणा दिवस रात झटत असताना जाणीवपूर्वक  महिन्याभरापासून कामावर हजर न होणाऱ्या डॉक्टर कनिष्ठ अभियंत्यांसह 14 सेवकांच्या विरोधात मनपा आयुक्त दीपक कासार यांनी कारवाई केली आहे.

आयुक्तांच्या आदेशानुसार या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुक्तांच्या या कारवाईने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहरात करोना चा पादुर्भाव रोखण्यासाठी मनपा प्रशासन यंत्रणेतर्फे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दररोज वाढत असलेल्या बाधित व संशयित रुग्णांच्या संख्येमुळे मनपा यंत्रणेवर अधिकचा ताण आला आहे. अशा आपत्तीच्या प्रसंगी देखील मनपा सेवक कामावर हजर राहत नसल्याने हा ताण अधिकच वाढत असून सेवेतील विस्कळीत पणामुळे यंत्रणेवर नागरिकांचा रोष देखील व्यक्त होत आहे.

गत महिनाभरापासून 3 डॉक्टर , 1 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दोन मिश्रक हे कायम सेवेतील तर मानधनावरील चार कनिष्ठ अभियंता दोन लिपिक संगणक चालक व शिपाई असे 14 सेवक कामावर हजर राहत नसल्याचे आयुक्तांनी केलेल्या चौकशीत आढळून आले.

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांतर्फे या 14 जणांना वारंवार भ्रमणध्वनी व व्हाट्सअप द्वारे कामावर हजर होण्याच्या सूचना व आदेश देण्यात आले होते. मात्र, याकडे या सेवकांनी दुर्लक्ष करत कर्तव्यात कसूर केला.

या घटनेची गंभीर दखल घेत आयुक्त कासार यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या या 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येथील किल्ला पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आतापर्यंत कर्तव्यात कसून आणि कामावर हजर न राहणाऱ्या 47 सेवकांवर अवघ्या तेरा दिवसात आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे. यामुळे मालेगाव मनपा वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे आयुक्तांनी केलेल्या कारवाईमुळे मालेगावातील सर्वसामान्य जनतेने आयुक्तांच्या कारवाईचे कौतुक केले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com