Thursday, April 25, 2024
Homeनाशिक25 लाख वाहन निर्मितीचा टप्पा पूर्ण महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा; विक्रमी क्षण साजरा

25 लाख वाहन निर्मितीचा टप्पा पूर्ण महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा; विक्रमी क्षण साजरा

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमधील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या प्रकल्पाने 25 लाख वाहन निर्मितीचा टप्पा पूर्ण केला आहे. कंपनीचे लोकप्रिय वाहन असलेली स्कॉर्पिओ 25 लाखावे वाहन ठरले. हा विक्रमी क्षण कंपनीचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी साजरा करत जल्लोष केला. याप्रसंगी, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे उत्पादन प्रमुख विजय कालरा, के. जी. शेनॉय, प्रकल्प प्रमुख प्रदीप देशमुख, जनंसपर्क अधिकारी कमलाकर घोंडगे आदी उपस्थित होते. विजय कालरा यांनी म्हटले की, ‘हा मैलाचा टप्पा साध्य करणे हा ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील आमच्या वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे.

- Advertisement -

त्याचे श्रेय अथक परिश्रम करणार्‍या नाशिक प्रकल्पामधील कार्यरत प्रत्येक सदस्याचे आहे. या प्रकल्पाने सातत्याने उत्पादनातील उत्कृष्टता साध्य केली आहे. आमची राईज ही विचारसरणी कायम राखण्यासाठी कोणतीही मर्यादा न ठेवण्याची प्रकल्पाची प्रेरणा आणि बांधिलकी दिसून येते. या मैलाच्या टप्प्यानंतर आगामी काळामध्ये आमचा नाशिक प्रकल्प आणखी अनेक गौरव प्राप्त करणार, याची खात्री असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, या प्रकल्पामध्ये सध्या स्कॉर्पिओ, मराझ्झो, एक्सयूव्ही 300, बोलेरो, ई-व्हेरिटो, अ‍ॅम्ब्युलन्स यांच्यासह विविध महिंद्रा उत्पादनांची निर्मिती केली जाते. आतापर्यंत या प्रकल्पास ‘आयएमइए : ‘फ्युचर रेडी फॅक्टरी’ पुरस्कार, टीपीएम : ‘कन्सिस्टन्सी’ पुरस्कार, एमपीसीबी : ‘वसुंधरा’ पुरस्कार, हेल्दी वर्क प्लेस : मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्ससाठी प्लॅटिनम लेव्हल अवॉर्ड आणि टीपीएम : जेआयपीएमकडून ‘एक्सलन्स अवॉर्ड’ महिंद्राने केंद्र सरकारच्या मेक-इन-इंडिया उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रचंड बांधिलकी दर्शवली आहे.

सामाजिक उपक्रम

महिंद्रा नाशिक आपल्या प्रमुख सीएसआर कार्यक्रमांद्वारेही समाजामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने एड्स जनजागृती व पुनर्वसन, ग्रामीण खेळाडूंचा विकास, रक्तदानासह थॅलेसेमिया रुग्णांची जबाबदारी, भव्य वृक्षारोपण तसेच चेक डॅम व व्हिलेज सपोर्ट प्रोग्रॅम यांचा समावेश आहे.

एफजे मिनी बस पहिले वाहन

महिंद्राच्या नाशिक उत्पादन प्रकल्पाची वाटचाल 1981 या वर्षामध्ये सुरू झाली. हा प्रकल्प एकूण 147 एकरांमध्ये विस्तारलेल्या क्षेत्रामध्ये सुरू झाला. त्यावेळी प्रकल्पाची उत्पादन क्षमता दोन लाख 10 हजार इतकी होती. एफजे मिनी बस हे पहिले वाहन तयार केल्यानंतर या प्रकल्पाने दररोज 8 वाहनांचे उत्पादन करण्यास सुरुवात केली. आज, अ‍ॅसेम्ब्ली लाइनमध्ये दररोज 700 वाहनांचे उत्पादन केले जाते. जगभरातील 34 हून अधिक देशांमध्ये ही वाहने निर्यात केली जातात.

- Advertisment -

ताज्या बातम्या