‘मनेरगा’च्या मजुरीत ३२ रुपयांची घसघशीत वाढ; दिवसाला मिळणार २३८ रुपये: गतवेळी अवघी ३ रुपयांची झाली होती वाढ

‘मनेरगा’च्या मजुरीत ३२ रुपयांची घसघशीत वाढ; दिवसाला मिळणार २३८ रुपये: गतवेळी अवघी ३ रुपयांची झाली होती वाढ
file photo

नाशिक । कुंदन राजपूत

लाॅकडाऊन काळात रोजगार हमीची कामे सुरु झाली असून त्यामुळे ग्रामीण भागात मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाने चालू अार्थिक वर्षात रोजगार हमीच्या मजुरी दरात ३२ रुपयांची वाढ दिली आहे. गतवर्षी फक्त तीन रुपये वाढ करण्यात आली होती. यंदा मात्र, घामाच्या दामाला घसघशीत वाढ मिळाल्याने मजुरांनी समाधान व्यक्त केले आहे.

ग्रामीण भागातील लोकांच्या काम मिळावे यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरु करण्यात आली. या योजने अंतर्गत वर्षातील ३६५ दिवसांपैकी शंभर दिवस रोजगाराची हमी दिली जाते. शंभर दिवसानंतर रोजगार व मजुरी देण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची असते.

या योजनेत गाळ काढणे, चर खोदणे, रस्ते डांबरीकरण, वृक्षारोपण ही कष्टाची कामे करावी लागतात. दरवर्षी नविन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी १ एप्रिलला मनरेगाच्या मजुरीत वाढ केली जाते. २०१७ ते २०१९ या सलग तीन वर्षात फक्त वर्षाला तीन रुपये वाढ देण्यात आली होती.

गतवेळी मोदी सरकारने फक्त तीन रुपये वाढ देत कामगारांची थट्टा केली होती. यंदा मात्र ३२ रुपयांची घसघशीत वाढ देत मजुरांच्या कष्टाला न्याय दिला आहे. त्यामुळे मजुरांनी समाधान व्यक्त केले आहे. गतवर्षी दिवसाला २०६ रुपये मजुरी दिली जात होती. आता दिवसाला २३८ रुपये इतकी मजुरी दिली जात आहे.

मजुरांना ‘अच्छे दिन’

मजुरीचा दर वाढविला जावा ही अनेक दिवसांपासूनची मागणी होती. काॅंग्रेसच्या २०११ – १४ या सत्ता काळात मजुरीत एकूण ४१रुपये इतकी मजुरीत वाढ झाली. तर भाजपच्या २०१५ – १९ वर्षात मजुरीचा दरात ३८ रुपयांची वाढ झाली. मात्र, २०२० आर्थिक वर्षात ३२ रुपये इतकी वाढ केली. ही मागील दहा वर्षातील सर्वात मोठी वाढ आहे.

वर्षनिहाय मजुरीत झालेली वाढ

२०११ – १२७
२०१२ – १४५
२०१३ – १६२
२०१४ – १६८
२०१५ – १८१
२०१६ – १९२
२०१७ – २०१
२०१८ – २०३
२०१९ – २०६
२०२० – २३८

केंद्रीय ग्राम विकास मंत्रालय मजुरीचे दर ठरविते. आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मनरेगाच्या मजुरीत वाढ केली जाते. यंदा ३२ रुपये मजुरी वाढविण्यात आली आहे.

– पल्लवी निर्मळ, उपजिल्हाधिकारी, रोहयो

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com