महाराष्ट्र दिन विशेष : मंगल देशा ! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र दिन विशेष : मंगल देशा ! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । कुंदन राजपूत

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा…

या शब्दांमध्ये कवी गोविंदग्रज यांनी महाराष्ट्राचे वर्णन केले आहे.  आज १ मे. आजच्याच दिवशी मराठी भाषिकांच्या स्वतंत्र्य राज्याची तुतारी फुंकण्यात आली. शाहिरांनी डफलिवर थाप देत त्यांच्या पहाडी आवाजातील पोवाडयांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही हाक देत मराठीमन चेतवले होते.

आचार्य अत्रे यांची मुलूख मैदान तोफ महाराष्ट्रासाठी धडाडत होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या मागणीसाठी १०५ हुत्तात्म्यांनी बलिदान दिले. तेव्हा कुठे १ मे १९६० ला मराठी भाषिकांचे राज्य देशाच्या नकाशावर अस्तित्वात आले. हुत्तात्म्यांचे बलिदान विसरुन  महाराष्ट्र दिन चिरायु होऊ शकत नाही. वर्तमानाने स्व:ताचा इतिहास विसरता कामं नये अस म्हणतात.  म्हणून हा केलेला प्रपंच.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यंशवतराच चव्हाण  ते आज पर्यंत झालेल्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रगतीत त्यांचे योगदान दिले आहे. उद्योगधंदे, शिक्षण, आरोग्य सेवा, शेती, सहकार,  सिंचन, दळण वळण, मूलभूत पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रात महाराष्ट्र देशात आज आघाडिवर आहे.

महाराष्ट्राला लाभलेले सुसंस्कृत नेतृत्व व मुख्यमंत्री म्हणून यंशवतराव वळखले जातात. कोयना, उजनी ही महाकाय धरणे बांधून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचे काम त्यांनी केले. उद्योग धंद्याची उभारणी करुन महाराष्ट्राला अौद्योगिक प्रगतीचा पाया त्यांनी रचला. राज्याचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी राज्यात हरितक्रांती घडवली. त्यासोबत शिक्षणातही राज्य अग्रेसर केले. शंकरराव चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मराठवाडयाचा दुष्काळ हटविण्यासाठी गोदावरीवर जायकवाडी हे महाकाय धरण बांधले.

बॅरिस्टर ए.आर.अंतुले हे  पहिले अल्पसंख्याक मुख्यमंत्री. अगदी अलीकडची त्यांच्या बद्दलची आठवण सांगायची तर   बेळगाव प्रश्नी उच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा अंगावर काळा डगळा चढवला होता.  महाराष्ट्राचे चारवेळा मुख्यमंत्री होण्याचा बहुमान शरद पवार यांनी पटकवला.तळहातांच्या रेषेप्रमाणे महाराष्ट्राच्या प्रश्नांची खडांखडा माहिती असलेला नेता ही त्यांची अोळख. तर अगदी अलीकडे पर्यंत मनोहर जोशी, विलासराव देशमुख ते उध्दव ठाकरेपर्यंत सर्व जणांनी महाराष्ट्राच्या जडण घडणीत महत्वाचे योगदान दिले व देत आहे.

काॅ. श्रीपाद डांगे, एस.एम.जोशींपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यत महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, वैचारिक बैठकीत प्रत्येकाने त्यांच्या परीने योगदान दिले. फुले, शाहू व आंबेडकर  यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम केले जात आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेला  आज ६० वर्ष पूर्ण होत आहे. पण यंदा या उत्सवावर करोना संकटाचे सावट आहे. मागील काही वर्षात महाराष्ट्राने अनेक संकटांशी दोन हात केले. १९७२ चा भीषण दुष्काळ, महापूर, किल्लारीचा भूकंप अशी अनेक संकटे महाराष्ट्राने पाहिली. त्याच्याशी दोन हात करत महाराष्ट्राने त्याचा पाठिचा कणा ताठ राखला. पण आता देशासह राज्यावर आलेले करोनाचे संकट हे  वरील आपत्तींपेक्षा भयाण आहे.

एका अदृश्य शत्रूशी महाराष्ट्र दोन हात करत आहे. राज्य शासन या संकटाच्या मगर मिठितून महाराष्ट्राला वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहे. करोनामुळे यंदा पहिल्यांदा घरी बसून महाराष्ट्र दिन साजरा करावा लागणार आहे. महाराष्ट्राविना देशाचा गाडा चालू शकणार नाहि असे बोलले जाते. करोना संकटावर मात करत देशाला दिशा देण्याची जबाबदारी आज महाराष्ट्रावर आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा आहे.

महाराष्ट्रासाठी संकटं ही नविन नाहित. पण महाराष्ट्र हा लढवय्या हे. आलेल्या संकटांचा भंडारा उडवत महाराष्ट्र धर्माचा ध्वज हा डौलाने आसमंतात फडकत आहे. पुढे देखील फडकत राहिल. मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हिच तमाम मराठी जणांकडून महाराष्ट्र दिनी अपेक्षा. पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन चिरायु होवो ….

Deshdoot
www.deshdoot.com