निष्ठा आणि व्यासंगातून मिळाली लेखनाची प्रेरणा : वीणा गवाणकर
स्थानिक बातम्या

निष्ठा आणि व्यासंगातून मिळाली लेखनाची प्रेरणा : वीणा गवाणकर

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

जानोरी | वार्ताहर

कृषीशास्त्रज्ञ जॉर्ज कार्व्हर, परिचारिका आयडा स्कडर, पाणीपंचायत उभी करणारे विलासराव साळुंखे, राज्यकर्त्या गोल्डा या आणि इतर कर्तृत्ववान व्यक्तींमध्ये असलेली कामाविषयीची जबरदस्त निष्ठा, ठोस प्रयोजन आणि त्याला असलेली व्यासंगाची जोड या गुणांनी भुरळ घातली. त्यातून त्यांच्या चरित्रलेखनाकडे वळले. असे ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनी सांगितले.

सह्याद्री फार्म्स, मोहाडी येथे ‘कार्व्हर लायब्ररी ॲण्ड स्टडी सेंटर’चे गुरुवारी (ता.19) त्यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. त्यावेळी आयोजित प्रकट मुलाखतीत गवाणकर यांनी त्यांच्या साहित्यनिर्मितीचा प्रवास उलगडला. कवी व गीतकार प्रकाश होळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे उपस्थित होते. मुलाखतकार स्वानंद बेदरकर यांनी सहज शैलीत वीणा गवाणकर यांच्याशी संवाद साधला. मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली.

कार्व्हर एक प्रयत्नवादी विचार

वीणा गवाणकर म्हणाल्या..कार्व्हर ही व्यक्ती नाहीय, तर तो एक विचार आहे. जसे गांधी ही व्यक्ती नाही. तो एक विचार आहे. ते एक असणं आहे. असं असणं हे कालातीत असतं..त्याला देशकालाच्या भौगोलिक सीमा नसतात.

-प्रयत्नांची पराकाष्ठा, स्वत:ला गाडून घेऊन नव काही करण्याची जी जिद्द, अस्खलनशीलता, काही झालं तरी मी माझं तत्व आणि सत्व सोडणार नाही, या सगळ्यातून येणाऱ्या जगण्याचा निचोड म्हणजे म्हणजे जॉर्ज कार्व्हर आहे.

-ध्यासमार्गावरुन चालत गेलेली ही झपाटलेली माणसे निष्ठा घेऊन चालली. केवळ काही तरी निष्ठा घेऊन ही माणसं चालत नव्हती, तर त्या मागे ठोस असं प्रयोजन होतं. त्यांच्या प्रयोजनाला अभ्यासाची जोड होती. ते ज्या समाजासाठी काम करीत होते त्या समाजाबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती. ही सुत्रं घेऊन ही लोक ध्यासपंथावरुन चालत होती. त्यांनी जग सुंदर केलं.

-कामावरची निष्ठा, स्वत:वरचा आत्मविश्वास आणि त्याला अभ्यासाची जोड दिल्याशिवाय लोकोपयोगी कर्तृत्व आकाराला येत नाही. हा अभ्यास मला नेहमी भूरळ घालतो.

सह्याद्रीचा उपक्रम स्तूत्य

प्रकाश होळकर म्हणाले, जॉर्ज कार्व्हर यांच्या नावाने लायब्ररी व स्टडी सेंटर सुरु करुन सह्याद्री फार्म्सने त्यांच्या कार्याची उचीत दखल घेतली आहे. या लायब्ररीमुळे मनाची आणि बुध्दीची मशागत होऊन शेतकऱ्यांमधून कसदार साहित्य जन्माला येवो अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

वाचनसंस्कृती वाढावी हा उद्देश

विलास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, शहरी आणि ग्रामीण भागात सकस साहित्याचे वाचन खुंटले आहे. जे वाचन आहे ते सोशल मिडियातील साहित्य वाचण्यापुरतेच आहे. त्यातून अनेक गुंते निर्माण होतांना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर कार्व्हर लायब्ररीच्या निमित्ताने पुन्हा वाचनसंकृती विकसित व्हावी हाच यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरेश नखाते यांनी सुत्रसंचालन केले. मंगेश भास्कर यांनी आभार मानले.

शास्त्रज्ञांचे बायोपिक का येत नाहीत?

साहित्य, चित्रपटांना आपण समाजाचा आरसा म्हणतो. मात्र कार्व्हर, आयडा स्कडर, रेमंडर, डॉ. खानखोजे विलासराव साळुंखे या सारख्या कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना न भूलता पूर्ण निष्ठेने काम करणाऱ्या लोकांची पुरेशी दखल या माध्यमांनी घेतली नाही. ही खंत व्यक्त करीत गवाणकर यांनी बायोपीक फक्त खेळाडूंवर होतात. प्रसिध्दीपासून कायम दूर राहून ज्यांनी संपूर्ण मानवजातीच्या विकासासाठी योगदान दिलंय अशा शास्त्रज्ञांवरही अधिक संख्येने चरित्र पुस्तके व बायोपिक का होत नाहीत? असा सवालही उपस्थित केला.

Deshdoot
www.deshdoot.com