Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदुसऱ्या दिवशीही ग्रामीण भागात लॉक डाऊन

दुसऱ्या दिवशीही ग्रामीण भागात लॉक डाऊन

सिन्नर : वार्ताहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार  रविवारी दि. 22 दिवसभर संपूर्ण देशात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. पाठोपाठ दुसऱ्या दिवशी देखील ग्रामीण भागात लॉक डाऊन करत लोकांनी कोरोना विरोधी लढाईत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आज संपूर्ण तालुक्यात अघोषित संचार बंदीची परिस्थिती होती.

- Advertisement -

प्रशासनाकडून ग्रामीण जिल्ह्यात देखील जमावबंदीचा आदेश लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच भागात व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत घरी राहणे पसंत केले. कोरोना वर मात करण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात न येण्याचे आवाहन शासनस्तरावरून करण्यात येत आहे. प्रतिबंध हाच मोठा उपचार कोरोनाच्या नियंत्रणासाठी असून त्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहे.

लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येणे हे हा प्रसार रोखण्याचे प्रभावी हत्यार असल्याची जाणीव ग्रामीण भागातील जनतेला देखील झाली आहे. म्हणूनच रविवारी दिवसभर जनता कर्फ्यू  पार पाडल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी देखील  संपूर्ण तालुक्यात कमालीची शांतता होती. लोकांनी सकाळपासूनच घराबाहेर पडणे टाळले असून व्यवसायिकांनी देखील लॉक डाऊन करत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.

गावागावात किरकोळ अपवाद वगळता अघोषित संचारबंदी राहिली. सकाळी दूध संकलन केंद्र सुरू असण्याबरोबरच किराणा दुकाने, औषधालय व दवाखाने उघडे राहिले. सकाळच्या प्रहरात काहीअंशी गावातील नाक्या-नाक्यावर लोकांचे व तरुणांचे  घोळके  बघायला मिळाले.

मात्र , त्याबाबत गावातील ज्येष्ठांनी तर काही ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हे घोळके पांगले. सर्वांनी आज दिवसभर घरातच राहणे पसंत केले.

किरकोळ अपवाद वगळता ग्रामीण भागातील वाहतुकीची साधने देखील बंदच राहिली. एसटी प्रशासनाकडून दोन दिवसांपूर्वी लॉक डाऊन करण्यात आल्याने व खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनीदेखील आपला यात सहभाग नोंदवला.  त्यामुळे अनेकांना इच्छितस्थळी प्रवास करता आला नाही. बहुतेक ठिकाणी प्रवासाची साधने उपलब्ध नसल्याने होम टू वर्क करण्याची वेळ कामगार व अनेक आस्थापनातील कर्मचाऱ्यांवर आली.

ग्रामीण भागात केवळ जमावबंदी लागू करण्यात आली असली तरी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःहून संचारबंदी केल्याचे चित्र ग्रामीण भागात अनपेक्षितरीत्या बघायला मिळाले. कोरोना विरुद्ध च्या लढाईत येत्या 31 डिसेंबर पर्यंत हीच परिस्थिती कायम ठेवण्याचा निर्धार अनेक गावातील व्यवसायिकांनी व नागरिकांनी केला आहे.

आपल्या गावात येणाऱ्या पाहुण्यांचा, बाहेरगावी जाऊन पुन्हा परत येणाऱ्यांवर देखील ग्रामस्थांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. परीसरातील संशयास्पद माहिती आरोग्य विभागाला  देण्यासाठी देखील नागरिक पुढे येत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे काम  सोपे झाले असून लोकांमध्ये स्वतःहून कोरोना जागृती आली असल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या