दारणा सांगवी येथे बिबट्या जेरबंद; ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास

दारणा सांगवी येथे बिबट्या जेरबंद; ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास

नाशिक | प्रतिनिधी 

दारणा सांगवी येथे आज वनविभागाने शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. पाच वर्षे वय असलेल्या या बिबट्याचा परिसरात संचार होता. बिबट्याच्या संचार आढळून आल्यानंतर शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. यानंतर याठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भीतीच्या सावटाखाली असलेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

याबाबत वनविभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, येवला वन क्षेत्रात असलेल्या निफाड तालुक्यातील दारणा सांगावी या गावात ग्रामस्थांच्या मागणीवरून रविवारी (दि १९) रोजी दगू खंडू करपे यांच्या गट क्रमांक ३४३ या शेतात पिंजरा लावण्यात आला होता.

आज पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे. या बिबट्याचे वय साधारण पाच वर्षे असून त्यास निफाड येथील रोपवाटिका येथे आणण्यात आले आहे. बिबट्याचे निरक्षण केले असता त्याच्या पोटाजवळ जखम आढळून आली असून ती जुनी जखम असल्याची प्राथमिक माहिती आहे.

निफाड येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याची तपासणी सुरु केली आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर बिबट्याला त्याच्या अधिवासात मुक्त केले जाईल अशी माहिती येवला वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी दिली.

यावेळी नाशिक पूर्व विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, मनमाड येथील सहायक वन संरक्षक सुजित नेवसे यांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com