झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड बिनविरोध ?
स्थानिक बातम्या

झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड बिनविरोध ?

Sarvmat Digital

महाविकास आघाडीला आव्हान कसे  देणार : व्हिपमुळे अनेकांची अडचण

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी आज निवड होणार आहे. महाविकास आघाडीने दोन्ही पदे बिनविरोध काढण्यासाठी पावले टाकली आहेत. आघाडीला आव्हान देणारी भाजपा आकड्यांच्या खेळात अडकली आहे. दुसरीकडे भाजपाची ज्या काँग्रेस सदस्यांवर भिस्त आहे, त्या सदस्यांच्या डोक्यावर व्हिपमुळे निर्माण होणार्‍या तांत्रिक संकटाची तलवार आहे. भाजपाने सत्तेसाठी दावा ठोकण्याचा निर्णय घेतला असला तरी ऐन निवडीच्यावेळी संख्याबळ जुळविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. या स्थितीत जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना आणि गडाख गटाच्या महाविकासआघाडी सत्तेचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्ष, उपाध्यक्षांची मंगळवारी निवड होणार आहे. यासाठी महसूलच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना आणि गडाख यांच्या महाविकासआघाडीने कंबर कसली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात 72 सदस्यांच्या संख्याबळात भाजप एकाकी पडल्याचे दिसत आहे. तोडक्या सदस्यांच्या बळावर भाजपा काय डाव टाकणार, याची उत्सुकता आहे. एका सदस्यांने राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने निवडीआधीच भाजपाला धक्का बसला आहे. जागा रिक्त झाल्याने भाजपचे जिल्हा परिषदेतील संख्याबळ 12 वर सदस्यांपर्यंतच आहे.

दुसरीकडे जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 23 सदस्य असून यात आ. बाळासाहेब थोरात गटाचे 10 तर उर्वरित 13 सदस्य आ. राधाकृष्ण विखे गटाचे होते. मात्र, काही दिवसांपूर्वी काँग्रेसने गट नेता बदलला असून विखे गटाचे 2 सदस्य आणि विद्यमान सभापती अनुराधा नागवडे यांनी थोरात गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विखे गटाचे संख्याबळ कमी झाले असून ऐनवेळी काँग्रेसच्या गट नेत्यांनी काढलेल्या व्हिपमुळे विखे गटाची तांत्रिक अडचण होण्याची शक्यता अधिक आहे.

या तांत्रिक अडचणीत सापडून सदस्यपदही धोक्यात येईल, याची जाणीव अनेक सदस्यांना आहे. भाजपाची सर्व भिस्त विखेंवर आहे. मात्र राज्यातील नव्या राजकीय समिकरणात महाविकास आघाडी सध्यातरी मजबूत दिसत आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जिल्हा परिषद निवडींमध्येही एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या एकसंघ आघाडीला आव्हान मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

दुपारी 1 पर्यंत अर्ज 3 वाजता मतदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या 23 व्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी आज मंगळवारी दुपारी निवड होणार आहे. यावेळी एकपेक्षा जास्त अर्ज आल्यास मतदानाची प्रक्रिया होणार असून त्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासोबत अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि नेवासा तालुक्यातील शेतकरी क्रांतीकारी पक्षाच्या महाविकास आघाडीने दावा केला आहे. तर दुसरीकडे भाजप आणि विखे गटाने या निवडीत उमेदवार देण्याचे यापूर्वी जाहीर केलेले आहे. यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार की ऐनवेळी भाजप माघार घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

जिल्हा परिषदेत आतापर्यंत 22 अध्यक्ष झाले असून त्यात सर्वाधिक काळ अध्यक्ष होण्याचा मान काँग्रेस पक्षाकडून शालीनीताई विखे पाटील यांना मिळालेला आहे. आता पुढील अडीच वर्षे अध्यक्ष होण्यापासून त्यांना रोखण्यासाठी राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी अस्तित्वात आली असून त्यांचे संख्याबळ 45 ते 50 पर्यंत पोहचल्याचा दावा करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला असून या ठिकाणी विद्यमान उपाध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना पक्षातून स्पर्धक नसल्याने आतापर्यंत त्यांचे नाव अध्यक्षपदासाठी टिकून आहे. मात्र, खरी अडचण उपाध्यक्षपद आणि अर्थ-बांधकाम समितीच्या सभापती पदाची आहे. या ठिकाणी काँग्रेस, सेना आणि गडाख गटात रस्सीखेच आहे. यामुळे हे दोन्ही पदे कोणाच्या वाटल्या जाणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

काँग्रेसमध्ये स्पर्धा
सोमवारी सायंकाळपर्यंत उपाध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, शिवसनेने या पदावर दावा केलेला असून त्याबाबत सोमवारी रात्रीपर्यंत चर्चा सुरू होती. दरम्यान, उपाध्यक्षपदावर काँग्रेसमधून प्रताप शेळके, अनिता हराळ आणि विद्यमान सभापती अनुराधा नागवडे यांची नावे आघाडीवर होती. मात्र, ना.बाळासाहेब थोरात हे उपाध्यक्षपदाचा उमदेवार जाहीर करणार असून ऐनवेळी संगमनेला देखील संधी मिळण्याची शक्यता आहे.

पाटील निवडणूक निर्णय अधिकारी
अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. सकाळी 11 ते 1 या वेळेत इच्छुकांना उमदेवारी दाखल करण्यात येणार असून त्यानंतर अर्जाची छानणी होवून गरज असल्यास मतदान घेण्यात येईल.

हात उंचावून होणार मतदान
जिल्हा परिषदेत 72 सदस्य असून या सदस्यांतून हात उंचावून मतदानाची प्रक्रिया पारपाडण्यात येणार आहे. आधी अध्यक्ष, त्यानंतर उपाध्यक्षपदाची निवड होणार आहे. सभागृहात सात रो मध्ये सदस्यांना बसविण्यात येणार असून त्या ठिकाणी मतदान मोजण्यासाठी सात रो अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

अडीच वर्षाच्या कामावर समाधानी : विखे
जिल्हा परिषदेत गेल्या अडीच वर्षात आपण केलेल्या कामावर समाधानी आहोत. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील यांनी ‘सार्वमत’शी बोलतांना स्पष्ट केले.

सहलीला गेलेेले सदस्य नगरकडे निघाले
अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांना पुणे, लवासा याठिकाणी सहलीवर पाठविण्यात आले होते. हे सदस्य सोमवारी सायंकाळी नगरकडे निघाले होते. सोमवारी रात्री उशीरा अथवा आज सकाळी हे सदस्य नगरमध्ये येणार आहेत.

महाविकास आघाडीची आज बैठक
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची सकाळी दहा वाजता नगरमध्ये बैठक होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीकडून पक्ष निरिक्षक अंकुश काकडे, सेनेकडून प्रा. शशिकांत गाडे, तर काँग्रेसकडून प्रभारी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांळुके चर्चा करणार आहेत. मात्र, या चर्चेत तिनही पक्षाचे प्रमुख मुंबईतून संपर्कात राहून निर्णय देणार आहेत. त्यानंतर 11.30 च्या दरम्यान निर्णयाप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करण्यास जिल्हा परिषदेत जाणार आहेत.

निवडणूक लढविण्याचा भाजपचा निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय भाजपच्या सोमवारी नगरमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, अध्यक्षपदाचा उमदेवार कोण याचे गूढ कायम आहे.

सोमवारी सायंकाळी माजी मंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात भाजपच्या पदाधिकारी, आमदार आणि माजी आमदारांची बैठक झाली. यावेळी आ. राधाकृष्ण विखे पाटील, आ. मोनिका राजळे, आ. बबनराव पाचपुते, माजी आ. शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड आणि जिल्हा परिषदेतील भाजपचे प्रतोद जालिंदर वाकचौरे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत चर्चा झाली. सत्तेसाठी आवश्यक असणारे सदस्य जुळविण्यासोबत ऐनवेळी कोणाची मदत घ्यावयाची यावर चर्चा झाली.

बैठकीत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला. यासाठी सोमवारी रात्री काही बोलणी करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या सुत्रांनी सांगितले. मात्र, अध्यक्ष उपाध्यक्षपदाचा उमेदवार हे जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भाजपने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीतील चुरस वाढणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com