दोन मुलांसह महिलेचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न ; केडगावातील घटना

दोन मुलांसह महिलेचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न ; केडगावातील घटना

अहमदनगर (प्रतिनिधी) – महिलेने दोन मुलांसह विष प्राशान करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास केडगावातील एकनाथनगरमध्ये घडली. विष घेतलेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक असून दोन्ही मुलांच्या पोटात विष न गेल्याने ते सुरक्षित आहे. दरम्यान, पतीने दारू पिऊन त्रास दिल्याने महिलेने वैतागून विष घेतल्याचे बोलले जात आहे.
करोनामुळे दारू दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परंतु, जिल्ह्यात मंगळवार पासून दारुची दुकाने सुरू करण्यात आली आहे. दारू पिऊन कुटुंबातील सदस्यांना त्रास देण्याचे प्रकार नित्याचेच आहे. असाच काहीसा प्रकार केडगावातील एकनाथनगरमध्ये घडला असल्याचे बोलले जात आहे. एकनाथनगरमध्ये पती-पत्नी आपल्या दोन मुलांसह राहत आहे. पती मंगळवारी रात्री घरी आला व पत्नीला त्रास देऊ लागला.
बुधवारी पण पतीचा पत्नीला त्रास सुरूच होता. यामुळे वैतागून महिलेने आपल्या पाच वर्षांच्या मुलीला व दहा वर्षांच्या मुलाला विष पाजून स्वतः विष प्राशान केले. दुपारी झालेल्या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. सुदैवाने दोन्ही मुलांच्या पोटात विष न गेल्याने ते सुरक्षित आहे. परंतु, महिलेने जास्त विष घेतल्याने तिची प्रकृती चिंताजनक असून रात्री उशिरापर्यंत ती शुद्धीवर आली नव्हती.
तिच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नितीन रणदिवे यांनी घटनास्थळी भेट दिली. रुग्णालयात जाऊन महिलेच्या तब्येतीची चौकशी केली. परंतु, संबंधित महिला शुद्धीवर नसल्याने जबाब नोंदविता आला नसल्याचे निरीक्षक रणदिवे यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com