Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्र…जेव्हा मुख्यमंत्री तहसीलदारांना खुर्चीवर बसवतात….

…जेव्हा मुख्यमंत्री तहसीलदारांना खुर्चीवर बसवतात….

मुंबई | प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही पदावर असो, त्याला योग्य सन्मान आणि आदर दाखविणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका कृतीची सांगली भागात चर्चा आहे. निमित्त होतं इस्लामपूरमधल्या वाळवा तहसील कार्यालयाच्या नव्या, देखण्या वास्तूच्या उद्घाटनाचे…

मुख्यमंत्री दोन दिवसांपूर्वी सांगली  जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. इस्लामपूरमधील वाळवा तहसील कार्यालयाच्या  एका सुंदर इमारतीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. स्वातंत्र्य लढ्यात ज्या गावातील प्रत्येक घराने आपले योगदान दिले असे हे वाळवा. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आंदोलनकर्त्यांचे हक्काचे ठिकाण असलेल्या कचेरीच्या परिसरातच  उभारण्यात आलेली ही इमारत म्हणजे नव्या युगातील प्रशासनाचे प्रतीक ठरावी अशीच आहे. तर अशा या इमारतीच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांचे सायंकाळी आगमन झाले.

- Advertisement -

उद्घाटन झाल्यावर लगेच होणाऱ्या जाहीर सभेसाठी लोकांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पालकमंत्री जयंत पाटील तसेच इतर मंत्री व राज्यमंत्री यांच्यासमवेत आगमन झाले आणि लगोलग हे सर्व जण तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय  इमारतीच्या दाराजवळ गेले. फीत वगैरे कापून मग रितीप्रमाणे मुख्यमंत्री व सर्व मान्यवर या इमारतीतील दालनांची पाहणी करू लागले. वरच्या मजल्यावरच बैठक सभागृह पाहून मुख्यमंत्री सर्वात शेवटी खालच्या मजल्यावरील तहसीलदारांच्या दालनापाशी आले. इमारतीतील हे प्रमुख कार्यालयच असल्याने स्वाभाविकच आतमध्ये येऊन त्यांनी कार्यालयाची रचना पाहायला सुरुवात केली.

समोर तहसीलदारांची खुर्ची होतीच. त्यात थोडंसं बसून अचानक ते उठले आणि थोड्या दूरवर उभ्या असलेल्या तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या हाताला पकडून खुर्चीपाशी आणले आणि काही कळायच्या आत त्यांना फर्मावले “तुम्ही तहसीलदार ना? मग ही खुर्ची तुमची आहे…बसा इथे”  खुद्द मुख्यमंत्री प्रेमळ शब्दांत आदेश देत आहेत, तिथे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, मंत्री, राज्यमंत्री उपस्थित आहेत त्यामुळे साहजिकच गांगरलेल्या सबनीस यांनी मुख्यमंत्र्यांना नम्रपणे मी बसू शकत नाही असे सांगितले. पण मुख्यमंत्र्यांनी ठरवलेच होते. “ ही तुमची इमारत आहे, याठिकाणी तुम्ही प्रमुख म्हणून  काम पाहणार आहात, ही तुमची खुर्ची आहे. या खुर्चीवर माझ्या हस्ते तुम्हाला स्थानापन्न करायचे आहे” असे मुख्यमंत्र्यांनी आग्रहाने सांगितल्यावर मग सबनीस यांचा नाईलाज झाला आणि ते त्या खुर्चीवर बसले. “ या महत्वाच्या पदावर तुम्ही आहात. तुम्हाला मी स्वत: बसवले आहे त्यामुळे काम पण चोखपणेच करा” असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सबनीस यांची पाठ थोपटली.

या इमारतीच्या बाहेर एक फार जुने कडूनिंबाचे झाड होते. या झाडाला वाळव्यातील नागरिक स्वातंत्र्यसंग्रामाचा साक्षीदार मानत, त्याला त्यांनी तोडूही दिले नव्हते मात्र नंतर त्याचे दुसरीकडे  पुनर्रोपण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना या झाडाविषयी अगोदरच माहिती देण्यात आली होती. त्या झाडाच्या जागेपाशी काही काळ थांबून मुख्यमंत्री सोबतच्या अधिकारी-कर्मचार्यांच्या लवाजम्याला म्हणाले “ कडूनिंबाच्या या झाडाप्रमाणे वागा, खूप सावली द्या, आणि या झाडासारखे प्रेम मिळवा. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्याकडे येणाऱ्या लोकांना समजून घ्या”

“मुख्यमंत्री उद्घाटन करून तिथून निघूनही गेले, पण तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा या नवीन दालनातल्या माझ्या खुर्चीवर बसतो, मला शेजारी राज्याचे मुख्यमंत्री खुद्द उभे आहेत असा भास होतो” रवींद्र सबनीस सांगत होते. मुख्यमंत्र्यांचा विनयशीलपणा आणि दिलेल्या योग्य सन्मानामुळे केवळ तहसीलदार सबनीसच नव्हे तर तेथील सर्वच कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी अधिकच वाढली आहे याची जाणीव झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या