पाणी आवर्तन बैठकीला नववर्षातच मुहूर्त
स्थानिक बातम्या

पाणी आवर्तन बैठकीला नववर्षातच मुहूर्त

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या कालवा समितीच्या बैठकीला वर्ष संपत आले तरी मुहूर्त लाभला नाही. एकाही पाणीवापर संस्थेने पाण्याची मागणीही केली नाही. खातेवाटपाच्या उशिरामुळे यंदा नवर्षांत या बैठकीला मुहूर्त लागण्याची चिन्हे असून सर्वच पाणी आवर्तने ही जानेवारीच्या मध्यान्हानंतरच देण्यास सुरुवात होणार असल्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नवे सरकार अस्तित्वात आले आहे. मात्र, राष्ट्रवादीत जलसंपदा खाते कोणाकडे हे अद्याप निश्चित झाले नाही. त्यामुळे कालवा समितीच्या बैठकांचीही तारीख निश्चित होऊ शकल्या नाहीत. मात्र, येत्या काही दिवसात हे सर्वच विषय निकाली निघणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार 15 ऑक्टोबरला सर्वच धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यानुसार पुढील संपूर्ण वर्षाचे पाणी आरक्षण आणि वाटप निश्चित केले जाते.

त्यात पिण्यासह बिगर सिंचनाचे अन् सिंचनाचे असे विभाजन केले जाते. त्यानुसार लागलीच पुढील आवर्तने देण्यासाठी कालवा समित्यांच्या बैठकांमध्येही तारखा निश्चित केल्या जातात. पण यंदा जिल्ह्यात शंभर टक्केपेक्षा जादा पाऊस झाला. धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना रब्बीसाठी पाण्याची अथवा आवर्तनांची आवश्यकता नाही. त्यामुळे अद्यापर्यंत पाणी वापर संस्थेकडून सिंचन अथवा बिगर सिंचनासाठी तत्काळ पाणी द्यावे, अशा मागणीचा प्रस्ताव आला नाही. आगामी वर्षातील पाण्याच्या ठरलेल्या नियोजनानुसारच पाणी द्यावे अशी या संस्थांची भूमिका आहे.

Deshdoot
www.deshdoot.com