विखे कारखान्याच्या चेअरमनपदी आ. राधाकृष्ण विखे

लोणी (प्रतिनिधी) –  पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदावर विश्वासराव कडू यांची एकमताने निवड झाली.

कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. या निवडणुकीनंतर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीकरिता निवडणूक निर्णय आधिकारी गोंविद शिंदे यांनी संचालक मंडळाची पहिली बैठक कारखान्याच्या सभागृहात बोलावली होती.

या सभेत विद्यमान व्हाईस चेअरमन कैलासराव तांबे यांनी चेअरमन पदाकरीता माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची सूचना मांडली. त्यास सतीश शिवाजीराव ससाणे यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी विश्वासराव कडू यांच्या नावाची सूचना स्वप्नील निबे यांनी मांडली साहेबराव म्हस्के यांनी अनुमोदन दिले. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी 1987 ते 1992 आणि 1992 ते 1995 या कार्यकाळात चेअरमन पदाची धुरा सांभाळली होती.

या निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन आ. राधाकृष्ण विखे पाटील आणि व्हाईस चेअरमन विश्वासराव कडू यांचा सर्व संचालकांनी सत्कार करुन अभिनंदन केले. निवडणूक निर्णय आधिकारी गोविंद शिंदे व तहसिलदार कुंदन हिरे यांचाही या सभेत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ. विखे पाटील म्हणाले की, बाळासाहेब विखे यांनी घालून दिलेल्या वाटचालीनुसारच या कारखान्याचे काम सुरू आहे.

भविष्यात पाण्याच्या उपलब्धतेनुसार कार्यक्षेत्रात ऊस निर्माण करण्याचा कार्यक्रम आपल्याला हाती घ्यावा लागणार आहे. यासाठी सर्व संचालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करुन ते म्हणाले की, कारखान्याचे आधुनिकीकरणाचे मोठे काम झाले आहे. त्यामुळे आता चांगल्या क्षमतेने उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचा संकल्प करण्याचे सूचित केले.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनीही अगामी दोन वर्षे हे साखर कारखानदारीच्या दृष्टीने महत्वाची असुन या कार्यकाळात कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन अधिक कसे होईल यासाठी नवीन संचालक मंडळाला काम करावे लागेल असे सांगितले. याप्रसंगी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

चेअरमन आ. राधाकृष्ण विखे पाटील, व्हाईस चेअरमन विश्वासराव कडुन आणि सर्व संचालकांनी निवडीनंतर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, नंदू राठी, अण्णासाहेब भोसले, डॉ. भास्करराव खर्डे, तुकाराम बेंद्रे, कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे यांच्यासह सर्व संस्थाचे पदाधिकारी, आजी माजी संचालक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *