सासूला गोळ्या झाडणारा आरोपी अटक
स्थानिक बातम्या

सासूला गोळ्या झाडणारा आरोपी अटक

Sarvmat Digital

वडझिरे येथील खून प्रकरण : घटनेचा उलगडा होणार

पारनेर (प्रतिनिधी) – लग्नाला विरोध केल्याच्या रागातून 17 फेब्रुवारीला रांधे येथील राहुल गोरख साबळे याने वडझिरे येथील सासू सविता सुनील गायकवाड यांच्यावर गोळीबार करून खून केला होता. आरोपी दीड महिन्यांपासून फरार होता. त्याला गुरुवारी (दि.26) पालघर जिल्ह्यातील वाडा येथील किरवली, पोस्ट वरले येथून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह प्रमोद वाघ, पोलीस कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, पोलीस कॉन्स्टेबल सत्यजित शिंदे यांनी ही कारवाई केली. गेल्या दीड महिन्यापासून राहुल साबळे फरार होता. या घटनेतील मुख्य आरोपी सापडल्याने घटनेचा उलगडा होणार आहे.

या अगोदर या खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल साबळेचा साथीदार सुरेश उर्फ नटराज सोन्याबापू मापारी (रा. लोणीमावळा) पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता. जळगाव येथून गावठी कट्टाची दोघांनी खरेदी केली होती. त्यामुळे या खून प्रकरणातील आरोपींची संख्या दोन झाली असून पिस्तूल खरेदीसह इतर घटनांचा उलगडा यामुळे होणार आहे.

बंदोबस्ताचा ताण असतानाही पारनेर पोलिसांनी कारवाई केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेवर मोठा ताण असून पारनेर शहरासह तालुक्यातील इतर मुख्य गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे. पारनेर पोलीस ठाण्यामध्ये पोलिस कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असतानाही पोलिस बंदोबस्त संभाळून वडझिरे घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com