संगमनेर : युटेक शुगरच्या गोडावूनला आग, 35 कोटींचे नुकसान
स्थानिक बातम्या

संगमनेर : युटेक शुगरच्या गोडावूनला आग, 35 कोटींचे नुकसान

Sarvmat Digital

आश्वी (वार्ताहर) –  संगमनेर तालुक्यातील पठार भागाला वरदान ठरणार्‍या कौठे-मलकापूर येथील युटेक शुगर कारखान्यात झालेल्या शॉर्टसर्कीटने स्टोअर रूमसह साखर गोडावूनला लागलेल्या आगीने साखरेसह स्टोअर साहित्य बेचीराख झाले. दुष्काळात तेरावा महिना म्हणीनुसार लॉकडाऊनच्या काळात 35 कोटींचे नुकसान झाले. सुदैवाने 150 ते 200 फुटावर असणार्‍या मुख्य साखर कारखान्यातील वीज बोर्ड रुम मधील केवळ फ्युज गेल्याने मुख्य कारखाना आगीपासून वाचला आहे.
शनिवार दि. 24 एप्रिल 2020 रोजी पहाटे सव्वा तीन वाजल्याच्या सुमारास साखर गोडावून व स्टोअर रुम यांच्या मधोमध असणार्‍या पॅनलबोर्डमध्ये अचानक जाळ निघाल्याचा गेटवर असणार्‍या रक्षकाला दिसले. मात्र घटनेच्या ठिकाणी रक्षकास पोहचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले. साखर गोडवूनमध्ये केबलच्या साहाय्याने आगीने झेप घेतली तर स्टोअर रुम व गोडावून शेजारील असणार्‍या दोर्‍याचा नाडा, टायरलाही आग लागली. पहाटेची वेळ असल्याने सुसाट वार्‍यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. स्टोअरमधील कॉम्प्युटर्स, लॉपटॉप, लहान-मोठ्या बेरिंगस, मोटरी, ऑईलस् बॉयलर, मशिनरी, जाळ्या असे लाखो रुपये किंमतीचे साहित्य व कागदपत्रे तर साखर गोडावूनमधील 92 हजार 560 क्विंटल साखर बेचीराख झाल्याने सुमारे 35 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले.
लागलेल्या आगीची माहिती रक्षकांनी जनरल मॅनेजर अशोक वाघ यांना दिली. त्यांनी सहकार महर्षी थोरात व पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखाना व देवळाली प्रवरा नगरपरिषदचे अग्नीशामक बंब पाचारण केले. क्षणाचा विलंब न लावता या तीनही ठिकाणचे अग्नीशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. विशेष म्हणजे घटनेच्या ठिकाणाहून केवल 150 ते 200 फुटाच्या अंतरावर मुख्य साखर कारखाना होता. झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे केवळ कारखान्याच्या वीज रुम बोर्डमध्ये फ्युज गेल्याचे निष्पण झाल्याचे दिसून आले. अग्नीशामक वेळेवर आल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
घटनेची वार्ता परिसरात पोहचल्याने लॉकडाऊनमुळे घटनास्थळी लोक पोहचलेचं नाही. केवळ, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भोसले, जनरल मॅनेजर अशोक वाघ, मंडलिक, डहाळे, इलेक्ट्रीक आधिकारी, इन्शुरेनस आधिकारी उपस्थित होते. यावेळी फिजीकल डिटन्सिंग पाळून पंचनामा करण्यात आला. करोनाच्या थैमानाला रोखण्याकरिता देशात लॉकडाऊन झाले यामुळे उद्योग, सहकार क्षेत्रात मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असता त्यात अशा घटना घडणे हे दुदैवीचं समजावे लागेल.
मार्च महिन्याच्या अखेरीस ऊस उत्पादकांचे ऊस पेंमेंट द्यायची होती, मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन झाले. त्यामुळे पेंमेंट देणे राहिले. मात्र लॉकडाऊन संपताक्षणी आठ दिवसांच्या आत सर्व ऊस उत्पादकांना पेमेंट दिले जाईल, अशी ग्वाही युटेकचे जनरल मॅनेजर अशोक वाघ यांनी दिली.
Deshdoot
www.deshdoot.com