शिर्डीतून रेल्वेने 1251 प्रवासी उत्तर प्रदेशातील लखीमपूरकडे रवाना

शिर्डीतून रेल्वेने 1251 प्रवासी उत्तर प्रदेशातील लखीमपूरकडे रवाना

सर्व प्रवासी शिर्डी परिसरातील कामगार; वैद्यकीय तपासणी करून प्रशासनाने पुरविल्या विविध सुविधा
शिर्डी (प्रतिनिधी)-  करोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे शिर्डी आणि परिसरात अडकून पडलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील 1251 कामगार व त्यांचे कुटुंबीय यांना बुधवारी दुपारी शिर्डी रेल्वेस्थानकावरून विशेष रेल्वेने टाळ्यांच्या गजरात उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले. आज गुरुवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत सदरहू रेल्वे लखमीपूर येथे पोहचेल.
राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी जारी करण्यात आली असून लॉकडाऊन आदेशीत करण्यात आले आहे. यामुळे राज्याच्या विविध भागात अन्य राज्यांतून आलेले कामगार, नागरिक, पर्यटक, विद्यार्थी आणि भाविक विविध ठिकाणी अडकून पडले होते. या सर्वांना विहित प्रक्रिया पार पडून त्यांच्या गावी आणि राज्यात जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे शासनाने आदेशित केले होते. संबंधित तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये घटना व्यवस्थापक यांना जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केले होते.
यासंबंधीची विहित प्रक्रिया तहसीलदार कुंदन हिरे तसेच तालुका प्रशासनातील अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सहकार्याने पार पाडून संबंधितांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी सर्व व्यवस्था केली. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. गत दोन दिवसांपासून ही प्रक्रिया पार पाडण्यात येत होती.लॉकडाऊनमुळे शिर्डी येथे अडकून पडलेल्या जवळपास 1484 जणांनी त्यांच्या मूळ गावी परत जाण्यासाठी तालुका प्रशासनाकडे विनंती अर्ज सादर केले होते. त्यापैकी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून 1251 जणांची रवानगी आज रेल्वेद्वारे करण्यात आली. यामध्ये 752 प्रौढ, 314 अर्धे तिकीट प्रवासी आणि 185 चार वर्षाखालील बालकांचा समावेश आहे.
बावीस डब्यांच्या रेल्वेमध्ये प्रत्येक डब्यात पन्नास प्रवाश्यांची सोय करण्यात आली होती. या सर्वांची योग्य ती वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके स्थापन करण्यात आली होती. विशेष रेल्वेने प्रवास करणार्‍यांसाठी साई संस्थानतर्फे जेवणाची, पाण्याचे पाऊच तसेच फूड पॅकेट पार्सलची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेस्टेशनपर्यंत त्यांच्या प्रवासाची व्यवस्था विविध शाळांच्या मदतीने करण्यात आली होती.
यासाठी तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली होती. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्यावतीने प्रवास करणार्‍यांसाठी दोन हजार मास्कचा पुरवठा करण्यात आला होता. रेल्वेने प्रवासी पाठविण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
लॉकडाऊनसारख्या अडचणीच्याप्रसंगी स्थानिक तालुका प्रशासनाने आत्मीयतेने केलेल्या सहकार्यामुळे तसेच उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाणे शक्य झाले असून, त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभारी आहोत, अशी भावना यावेळी प्रवाश्यांनी व्यक्त केली. जवळच्या नातेवाईकांकडे जात असल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता. यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, रेल्वेचे स्थानक प्रमुख बी.एस.प्रसाद, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com