त्र्यंबकेश्वर : तोरंगण घाट होतोय कचरा डेपो; जनावरांसाठी जीवघेणा
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर : तोरंगण घाट होतोय कचरा डेपो; जनावरांसाठी जीवघेणा

Gokul Pawar

वेळूंजे : त्र्यंबकपासून जव्हार कडे जाणाऱ्या आंबोली- तोरंगण घाटात भाजीपाला, प्लॅस्टिक कचरा, मृत कोंबड्या फेकण्यात आल्याने स्थानिक नागरिकांना, जनावरांना याचा त्रास होत आहे.

नाशिक – पालघर या जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख घाट म्हणून आंबोली – तोरंगण घाटाकडे पाहिले जाते. परंतु या लॉक डाऊन च्या काळात काही वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व सडलेला भाजी पाला, मृत कोंबड्या या रस्त्याच्या कडेला फेकण्यात येतात.

याद्वारे दुर्गंधी पसरून स्थानिक रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. चरायला जाणारी जनावरे हाच फेकलेला कचरा खातांना दिसून येतात. यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत.

हा कचरा थांबविण्यासाठी प्रशासनाने व येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सहभाग घेऊन नियोजन करायला हवे. हा घाट झाडा झुडपांनी वेढलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य बघण्यासारखे असते. परंतु अशा पद्धतीने कचरा होणार असेल तर हे निसर्ग सौंदर्य जपणार कोण ? हा मोठा यक्ष प्रश्न आहे.

अनेकदा कचरा फेकल्यानंतर तो जाळण्याचा प्रयत्न केला जातो. अशातच येथील जंगलाला अनेक वेळा वणवा लागलेला आहे.
-निवृत्ती जाधव, पोलिस पाटील

Deshdoot
www.deshdoot.com