Wednesday, April 24, 2024
Homeनगरजागतिक कर्करोग दिन : तंबाखू सेवनामुळे भारतात रोज होतात साडेतीन हजार मृत्यू

जागतिक कर्करोग दिन : तंबाखू सेवनामुळे भारतात रोज होतात साडेतीन हजार मृत्यू

कर्करोग निदान दिन विशेष

संगमनेर (वार्ताहर) – आज 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये प्रतीकात्मक स्वरूपात तंबाखूची होळी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. जगभरात तंबाखू सेवनामुळे होणार्‍या मृत्यूंपैकी सुमारे 15 टक्के मृत्यू एकट्या भारतात होत असल्याचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे.

- Advertisement -

तंबाखू सेवनामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. त्याचबरोबर कॅन्सरसारख्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तंबाखू सेवनामुळे भारतात रोज सुमारे साडेतीन हजार मृत्यू होतात तर एका वर्षात 13 लाख नागरिक मृत्यूला सामोरे जात आहेत. जगभरात तंबाखू सेवनामुळे 80 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याचा अहवाल पुढे आला आहे.

त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने व्यसनमुक्तीच्या संदर्भाने कार्यवाही सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज 4 फेब्रुवारी रोजी जगभरात कर्करोग विरोधी दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातही व्यसनमुक्तीच्या संदर्भाने प्रसार व प्रचार करण्यासाठी तंबाखूची प्रातिनिधिक स्वरूपात होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीचा प्रचार होऊन या व्यसनांपासून विद्यार्थी दूर जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मागील वर्षी राज्यात सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीने व शालेय शिक्षण विभागाच्या वतीने या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी तंबाखू व्यसनाचे होणारे दुष्परिणाम, व्यसन सोडण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न या संदर्भात जाणीव जागृती घडून आणली होती. त्यामुळे राज्यातील सुमारे 350 कुटुंंबांनी तंबाखू या व्यसनापासून मुक्ती मिळवली आहे. यावर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे 30 हजार कुटुंबांना तंबाखू या व्यसनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

त्याचबरोबर या उपक्रमाच्या अंतर्गत राज्यात मागील वर्षी तंबाखूमुक्त शाळा या उपक्रमात शाळा व शिक्षकांनी सहभाग नोंदविला आहे. यावर्षी देखील मागील वेळी ज्या शाळा तंबाखूमुक्त झालेल्या आहेत, त्या व्यतिरिक्त इतर शाळांची संख्या वाढेल आणि मोठ्या प्रमाणावर ती शाळा सहभागी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तंबाखूत सात विषारी रसायने
तंबाखू सेवन करण्याच्या प्रमाणात जगभरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तंबाखू खाल्ल्यामुळे सात हजार प्रकारची रसायने शरीरात प्रवेशित होतात. त्यामध्ये प्रामुख्याने निकोटिन, हायड्रोजन सायनाईड, अमोनिया, आर्सेनिक, नेप्थेलीन, कॅडमियम, बूटेन, कार्बन मोनॉक्साईड यासारख्या रसायनांचा समावेश आहे. धूम्रपानामध्ये 80 कर्कजनिक रसायनांचा समावेश असून धूम्रपान तंबाखूत 28 प्रकारच्या कर्कजनक रसायनांचा समावेश आहे.

तंबाखूचा आरोग्यावर होतो परिणाम
तंबाखू सेवनामुळे मानवी जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची बाबही समोर आली आहे. तंबाखू खाणार्‍या व्यक्तीच्या तोंडाला, केसांना दुर्गंधी येते. डोळ्यात जळजळ होणे. दातावरती डाग पडणे. हिरड्या कमजोर होणे, दात पडणे, हाडे कमजोर होणे. शुक्राणूंचे प्रमाण घटणे, वंध्यत्व निर्माण होणे, रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना महाराष्ट्रभूषण, तर शिक्षकांना महाराष्ट्ररत्न सन्मान
जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने जे विद्यार्थी प्रबोधन व प्रसार करुन तंबाखूच्या व्यसनापासून पालक व कुटुंबांना दूर करतील व या सामाजिक कार्यात सहभागी होतील त्या विद्यार्थ्यांना मागील वर्षीप्रमाणेच ‘महाराष्ट्र भूषण’ या सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. तर या कामासाठी जे शिक्षक प्रोत्साहन देऊन अधिक अधिक कुटुंबे व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रवृत्त करतील अशा शिक्षकांना देखील ‘महाराष्ट्र रत्न’ या सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. सलाम मुंबई फाउंडेशनने यासंदर्भात भूमिका जाहीर केली आहे.

धूम्रपानविरोधी कायदा काय सांगतो
भारतात धुम्रपान विरोधी कायद्यासंदर्भात विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. शालेय परिसराच्या 100 यार्ड क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या धूम्रपान विक्री करण्यात प्रतिबंध करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास प्रतिबंध करणार असून, धूम्रपानासंदर्भातील जाहिरातीसाठी प्रतिबंध केलेला आहेत. धूम्रपानाच्या वस्तूच्या आवरणावर 85% क्षेत्र जागेत वैधानिक इशारा छापण्याची अट घालण्यात आली आहेत. तसेच दूरदर्शन चित्रपट आदी ठिकाणी देखील मद्यपान धूम्रपान ध्वनी चित्र प्रदर्शित करताना वैधानिक इशारा दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या