’एक मुठ्ठी अनाज’ भागवणार एड्सग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांची भूक
स्थानिक बातम्या

’एक मुठ्ठी अनाज’ भागवणार एड्सग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांची भूक

Gokul Pawar

Gokul Pawar

अजित देसाई 

मोडलेल्या माणसांची दुःख ओली झेलताना,
त्या अनाथांच्या उशाला दिप लावू झोपताना….
कोणती ना जात ज्यांची ना धर्म कोणता,
दुःख भिजले दोन अश्रू माणसांचे माणसांना ….

या उक्तीनुसार राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी सांगितलेल्या मानवता धर्माचे आचरण करण्याचे काम नाशिकस्थित सु-संस्कृती फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे. एक मुठ्ठी अनाज.. या योजनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न आहे. एड्सग्रस्तांसाठी काम करणारी इनफंट इंडिया आणि ऊसतोडणी मजुरांसह आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलं-मुलींचा सांभाळ करणार्‍या शांतीवन या बीडमधील दोन संस्थांना वर्षभर पुरेल इतके धान्य आणि आवश्यक किराणासाहित्य संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तहानलेल्यास पाणी आणि भुकेल्याला जेवण हि आपली संस्कृती. मायबाप हो देव देवळातल्या मूर्तीत नाही तर तुमच्या अवतीभोवती दरिद्रीनारायणाच्या रूपात तो वावरत असतो. त्याची सेवा करा असा संदेश देत संत गाडगेबाबांनी समाजातील दिन-दुबळ्या, आजाराने ग्रासलेल्या घटकांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांच्या याच शिकवणुकीचा वारसा जपण्याचा निर्धार सु-संस्कृती फाउंडेशनचा आहे. समाजात आजही संवेदनशील लोकांची कमी नाही. केवळ त्यांच्यापर्यंत योग्य लोक पोहचत नाही ही उणीव सु-संस्कृतीनिश्चितच भरून काढेल.

आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांना एक मुठ्ठी अनाज.. या उपक्रमाविषयी पटवून देताना संस्थेचे कार्यवाहक त्यांना प्रति महिना शंभर रुपये याप्रमाणे वर्षाकाठी 1200 रुपये देणगी देण्याचे आवाहन करतात. अशा पद्धतीने जमा होणार्‍या रकमेतून इनफंट इंडिया आणि शांतीवनसाठी वर्षभराचे धान्य विकत घेऊन ते पोहचवले जाणार आहे. यासाठी मदतीचे हात जोडले जात असून योजनेत सहभागी होणार्‍यांस वर्षातून एकदा संस्थेकडे 1200 रुपये जमा करून त्याची रीतसर पावती घ्यायची आहे.

ही देणगी रोख स्वरूपात तसेच धनादेश आणि ऑनलाईन पेमेंट ऍप द्वारे देखील जमा करता येणार आहे. सामान्य स्वरूपात वर्षाला 1200 रुपये ही रक्कम किरकोळ वाटत असली तरी थेंबा थेंबाने साचणार्‍या तळ्यातून मोठ्या अन्नदान यज्ञाला हातभार लागतो याचे समाधान देणारा आणि घेणार्‍याच्या दृष्टीने अमूल्य आहे. मुठ्ठीभर अनाज योजनेत सहभागी होणार्‍याने अधिकची रक्कम देणगी म्हणून दिली तरी चालते. शिवाय तुमच्या प्रियजनांच्या स्मरणार्थ देखील धान्य व किराणा विकत घेऊन देता येईल किंवा मोठे व्यापारी व्यावसायिक देखील आपल्या इच्छेनुसार धान्य-तेल आदी वस्तू देऊ शकतील.

अशोक आचार्य हे या योजनेचे प्रमुख असून धंनजय जैन सु-संस्कृती फाउंडेशनचे संस्थापक आहेत. आशिष पांडे, प्रमोद देव, समीर भावे हे पदाधिकारी म्हणून जबाबदारी वाहत आहेत. इनफंट इंडिया या संस्थेशी नाशिकमधील विविध स्तरात कार्यरत असणार्‍या दोनशेहून अधिक व्यक्ती जोडल्या गेल्या असून भविष्यात त्यांच्याच माध्यमातून सु-संस्कृतीचे काम देखील पुढे नेण्यात येणार आहे.

इनफंट इंडिया, शांतीवनबद्दल …

मराठवाड्यातील बीड जिल्हयात पाली येथे दत्ता बारगजे यांनी सुरु केलेल्या इनफंट इंडिया या एड्सग्रस्तांच्या शेल्टर होम मध्ये 70 मुले -मुली आणि 8 विधवा आश्रयाला आहे. या मुलामुलींच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी संस्थेकडून घेण्यात आली आहे. तर शिरूर कासार तालुक्यात आर्वी येथे दिपक नागरगोजे यांच्या शांतीवनमध्ये ऊसतोडणी कामगार आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची 268 मुलेमुली आहेत. या दोन्ही ठिकाणी चालणारी कामे सु-संस्कृतीच्या टीमने जवळून पहिली आहेत. त्यामुळे मुठ्ठीभर अनाज योजनेचे सत्पात्री दान सार्थकी लागेल असा विश्वास सर्वांना आहे.

नाशिप्रच्या शाळांची प्रेरणा
दोन वर्षांपूर्वी मराठवाड्यात भयाण दुष्काळाची परिस्थिती होती. त्यावेळी इनफंट इंडियातून मदत स्वरूपात तूरडाळ पाठवण्याची विनंती आचार्य यांच्याकडेकरण्यात आली. एड्सग्रस्तांच्या आहारात तूरडाळ अधिक प्रमाणात देण्यात येत असल्याने किमान 15 पोती तुरडाळीची आवश्यकता होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी लोकांकडे हात पसरले तरी किती मदत मिळणार असा विचार करून आचार्य यांनी नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेच्या सचिवांकडे शहरातील चार शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूठभर तूरडाळ देण्याचे आवाहन करण्याची परवानगी मागण्यात आली. आणि केवळ दोनच दिवसांत चार शाळांमधून विद्यार्थीं-शिक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे12 पोती डाळ जमा झाली. ही घटनाच मुठ्ठीभर अनाज योजनेला जन्म देणारी ठरली आहे असे आचार्य यांनी नमूद केले.

28 जानेवारीला शुभारंभ
ख्यातनाम संगीतकार ओ पी नय्यर यांच्या स्मरणार्थ येत्या 28 जानेवारीला प. सा. नाट्यमंदिरात संगीत मैफिल आयोजित करण्यात आली आहे. तेथेच मुठ्ठीभर अनाज योजनेचा औपचारिक शुभारंभ देखील केला जाईल. नाशिकसोबतच संपूर्ण राज्यात या योजनेची व्याप्ती वाढवून सर्वसामान्य समाजघटकांना मोहिमेत सामावून घेतले जाईल असे प्रकल्प प्रमुख आचार्य यांनी देशदूतला सांगितल

Deshdoot
www.deshdoot.com