केडगावातील टायरचे शोरूम फोडणारी टोळी जेरबंद
स्थानिक बातम्या

केडगावातील टायरचे शोरूम फोडणारी टोळी जेरबंद

Sarvmat Digital

तीन अल्पवयीनांचा समावेश : 22 लाख 71 हजारांचा माल हस्तगत

अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगाव येथील टायरचे दुकान फोडून साडेनऊ लाखांचे टायर चोरून नेणार्‍या टोळीला कोतवाली पोलिसांनी 24 तासांत सुपा (ता. पारनेर) येथे जेरबंद केले आहे.

मनोज उत्तम बोठे (वय-22 रा. पारगाव मौला, ता. नगर), अभिषेक अर्जुन करजुले (वय-20 रा. पाडळी रांजणगाव, ता. पारनेर), बाळासाहेब रामभाऊ पुंड (वय-40 रा. शिंगवे तुकाई, ता. नेवासा) अशी अटक केेलेल्या आरोपींचे नावे आहेत. तीन विधीसंघर्षित (अल्पवयीन) बालकांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 22 लाख 71 हजार 800 रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे. कोतवाली पोलिसांना या कामगिरीबद्दल प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी तपास पथकाला तीन हजार रुपयांचे बक्षिस दिले आहे.

प्रितेश बाफना यांचे केडगावात अरिहंत नावाचे दुचाकी, चारचाकीच्या टायरचे दुकान आहे. सोमवारी (दि. 24) रात्री साडेआठच्या सुमारास दुकान बंद करून बाफना घरी गेले. साडे आठनंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या मागील बाजूचे पत्रे उचकटून दुकानामधील दुचाकी व चारचाकी वाहनाचे 515 टायर, 720 ट्यूब असा नऊ लाख 47 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी भेट दिली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांच्या पथकाला आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना व मार्गदर्शन केले. आरोपींनी चोरलेला माल सुपा गावात विक्री करण्यासाठी आणणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्याआधारे पोलिसांनी सुपा गावात सापळा लावून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख 18 हजार रुपये किंमतीचे दुचाकीचे 445 टायर, एक लाख 57 हजार 500 रुपये किंमतीचे चारचाकीचे 45 टायर, एक लाख 31 हजार 800 रुपये किंमतीच्या 720 ट्यूब, 24 हजार 500 रुपये किंमतीचे चार मोबाईल, दहा लाख रुपये किंमतीचा एक पिकअप, तीन लाख रुपये किंमतीचा छोटा हत्ती (क्र. एमएच-16 एवाय-2066) व एक दुचाकी असा 22 लाख 71 हजार 800 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ, पोलीस नाईक गणेश धोत्रे, शाहीद शेख, नितीन शिंदे, भारत इंगळे, सुजय हिवाळे, पी. आर. राठोड यांच्या पथकाने केली.

अल्पवयीन मुलगा मास्टरमाईंड
चोरी करणार्‍या टोळीतील तिघांना अटक केली आहे. या गुन्ह्यात तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहेत. ते एकमेकांचे मित्र असून महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. वाडीया पार्क येथील कट्ट्यावर त्यांच्या गप्पा रंगत. त्यातील एकाला दुचाकी घ्यायची होती. एकावर दुचाकीचे लोन होते. सर्वांना पैशाची गरज असल्याने त्यांनी गुन्हा करण्याचे नियोजन केले. अल्पवयीन मास्टरमाईंडने प्रत्येकाला 30 हजार रूपये देण्याचे कबूल केले होते. यातून पुढे इतरांच्या मदतीने गुन्हा करण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com