थर्टीफस्टसाठी पोलीसांची विशेष मोहिम; यंत्रणा सज्ज तळीरामांची होणार धरपकड
स्थानिक बातम्या

थर्टीफस्टसाठी पोलीसांची विशेष मोहिम; यंत्रणा सज्ज तळीरामांची होणार धरपकड

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । प्रतिनिधी

नातळ आणि पुढे नववर्ष स्वागत पार्ट्यांचे आयोजन करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. कायदा सुव्यवस्था व अपघात टाळण्यासाठी 25 पासून तळीराम, वाहनचालकांना पकडण्याची मोहिमच हाती घेण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नाताळ अवघा दोन दिवसांवर तर आठडाभरावर थर्टीफस्ट आला आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यापासूनच नववर्षांची चाहुल लागते आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वांची तयारी सुरू होते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मद्याची सर्वाधिक विक्री होते. त्यातच नववर्ष स्वागत पार्ट्यांच्या आयोजनाने काही वर्षात नवीन रूप घेतले आहे. या इव्हेंट मॅनेजमेंट थीमद्वारे काही दिवसातच कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. अशात पहाटे पर्यंत बार सुरू ठेवण्यास गृह विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे तळीरामांसाठी ही चांगलीच पर्वणी ठरणार आहे. यासाठी काही अटी शर्थीचे पालन संबंधीत व्यावसायिकांना करावे लागणार आहे.

दरम्यान, मद्यपान आणि त्यानंतर निर्माण होणारे सुरक्षेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. नियमांचे पालन करीत नववर्षांचे स्वागत जरूर करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. मद्यपी वाहन चालक, महिलांची सुरक्षितता, हाणामारी असे प्रकार रोखण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून 25 डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दररोज पोलिसांची विशेष मोहिम कार्यन्वित ठेवण्यात येणार आहे.

यात मद्यपी वाहन चालकांसह समाजकंटकांवर कारवाई करण्यात येणार आहे. उत्सव आणि उत्साह यांचा ताळमेळ प्रत्येकाने घातल्यास पुढील गैरप्रकार टाळता येतील. कायदा व सुव्यवस्था कायम राखणे हे पोलिसांचे कर्तव्य असून, त्यादृष्टीने आमचे नियोजन ठोस राहणार असल्याचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगीतले.

हॉटेल्स चालणार पहाटेपर्यंत

नाताळ व थर्टीफस्ट साजरा करणार्‍यांना गृह विभागाने दिलासा दिला असून, 24, 25 आणि 31 डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. शासनाला सुरक्षेबरोबरच महसुलही महत्त्वाचा असल्याने या तीन दिवसात पहाटे पाच वाजेपर्यंत सर्व परमीट रूम्स, शाकाहारी हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि ऑर्केस्ट्रा बार सुरू ठेवण्यास गृह विभागाने मंजुरी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com