श्रीरामपूर : विखे-मुरकुटे गटाचा झेंडा

श्रीरामपूर :  विखे-मुरकुटे गटाचा झेंडा

नाट्यमय घडामोडीनंतर सभापतिपदी संगीता शिंदे तर उपसभापती बाळासाहेब तोरणे

श्रीरामपूर (प्रतिनिधी )-  नाट्यमय घडामोडीनंतर श्रीरामपूर पंचायत समिती सभापतिपदी विखे-मुरकुटे गटाच्या सौ. संगीता सुनील शिंदे तर उपसभापतिपदी दुसर्‍यांदा बाळासाहेब तोरणे यांची निवड झाली आहे. सौ. शिंदे यांनी ससाणे गट सोडून विखे-मुरकुटे गटात प्रवेश केल्याने नागरिकांचा मागास प्रवर्ग गणातून विजयी झालेल्या सभापतिपदाच्या दावेदार सौ.वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता त्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागणार आहेत.

श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी काल दि. 7 जानेवारीला दुपारी 3 वाजता पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत पाटील व गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे आदींच्या उपस्थितीत सदस्यांची बैठक झाली.

यावेळी मुरकुटे-विखे गटाचे सौ. संगीता शिंदे, दीपक पटारे, बाळासाहेब तोरणे, सौ. कल्याणी कानडे, सौ. वैशाली मोरे तर ससाणे गटाचे सौ. डॉ. वंदना मुरकुटे, अरूण नाईक, विजय शिंदे आदी सदस्य उपस्थित होते. ही निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत माजी विरोधी पक्षनेते आ. राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे स्वतः पंचायत समितीत बसून होते.

सभापती पदासाठी ससाणे गटाकडून सौ.वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे तर उपसभापती पदासाठी विजय गोपिनाथ शिंदे यांनी तर विखे-मुरकुटे गटाकडून सभापती पदासाठी सौ. संगीता सुनिल शिंदे तर उपसभापती पदासाठी बाळासाहेब तोरणे यांनी अर्ज दाखल केले होते. हात वर करून झालेल्या मतदानात संगीता शिंदे व बाळासाहेब तोरणे यांना प्रत्येकी पाच तर वंदना मुरकुटे व विजय शिंदे यांना प्रत्येकी तीन मते पडली. मतांचे बलाबल बघून प्रांताधिकारी अनिल पवार यांनी संगीता शिंदे यांना सभापतीपदी तर बाळासाहेब तोरणे यांना उपसभापती विजयी घोषित केले.

श्रीरामपूर पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्ग महिला होते. या प्रवर्गातील ससाणे गटाच्या डॉ. वंदना मुरकुटे व संगीता शिंदे या दोन सदस्या दावेदार होत्या. मात्र संगीता शिंदे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे वंदना मुरकुटे यांना सभापतपदी संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र विखे-मुरकुटे गट संगीता शिंदे यांना आपल्या गटात घेऊन पंचायत समितीवर सत्ता मिळविण्यात यशस्वी झाला आहे.

संगीता शिंदे या पंचायत समितीत काँग्रेसच्या गटनेत्या होत्या. मात्र त्या विखे -मुरकुटे गटात गेल्याने ससाणे गटाने जिल्हा परिषदेप्रमाणे गटनेता बदलण्याची खेळी करून वंदना मुरकुटे यांची गटनेतेपदी निवड केली. त्यास जिल्हाधिकार्‍यांची मान्यताही घेतली. नूतन गटनेत्या वंदना मुरकुटे यांनी संगीता शिंदे यांच्यासह आपल्या पक्षातील सदस्यांना ‘व्हीप’ बजावला. विखे-मुरकुटे गटानेही संगीता शिंदे यांच्या सहीने वंदना मुरकुटे यांच्यासह काँग्रेसच्या सदस्यांना ‘व्हीप’ बजावला. त्यामुळे पेच वाढला.

निवडणूक प्रक्रियेच्या वेळी सौ. वंदना मुरकुटे यांनी सौ. संगीता शिंदे यांच्या उमेदवारीला निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे आक्षेप घेतला. सौ. शिंदे यांनी ‘व्हीप’ चे पालन न केल्याची तक्रार त्यांनी केली. मात्र आपण फक्त पीठासीन अधिकारी असून आपण योग्य त्या ठिकाणी दाद मागावी असे सांगून ही हरकत फेटाळण्यात आली. त्यामुळे मुरकुटे यांना आता जिल्ह्याधिकार्‍यांकडे दाद मागावी लागणार आहे.

या निवडीवेळी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात दोन्हीही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड जाहीर झाल्यानंतर आ. राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे बाहेर येताच ससाणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली तर विखे मुरकुटे गटाच्या कार्यकर्त्यांनीही प्रति घोषणाबाजी केली.

निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती व उपसभाती यांचा पंचायत समिती आवारात सत्कार करण्यात आला. यावेळी आ. राधाकृष्ण विखे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, मावळते सभापती दीपक पटारे, जि. प. सदस्य शरद नवले आदींची भाषणे झाली.
यावेळी मुळा प्रवराचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे, नाना शिंदे, राधाकृष्ण आहेर, नगरसेवक मुख्तार शाह, पं.स. सदस्या कल्याणी कानडे, वैशाली मोरे, नगरसेविका वैशाली चव्हाण, गिरीधर आसने, विठ्ठलराव राऊत, गणेश भाकरे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संगिता शिंदे यांच्या धाडसामुळे हेे यश : विखे
पंचायत समितीची सत्ता मिळविणे अवघड होते, मात्र सौ. संगिता शिंदे यांनी दाखविलेल्या धाडसामुळे हे शक्य झाले. आता श्रीरामपूरच्या विकासासाठी काम करता येईल. पंचायत समिती इमारतीसाठी नऊ कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच त्याचेही भूमिपूजन नवीन पदाधिकार्‍यांच्या कार्यकाळात होणार आहे, असे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.  तर माजी आ. भानुदास मुरकुटे म्हणाले, या नूतन सभापती-उपसभापती यांच्या हातून पंचायत समितीच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्यात विकासाची जास्तीत जास्त कामे व्हावीत, यासाठी सदिच्छा.

मी भाग्यवान : डॉ. वंदना मुरकुटे
निवडणूक निकालानंतर पराभूत उमेदवार डॉ. वंदना मुरकुटे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, ‘मी स्वतःला इतके भाग्यवान समजते की महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते माझ्या विरोधासाठी मी श्रीरामपुरात आणले’. वैयक्तीक तुमचा काय द्वेष असेल तो तुम्ही श्रीरामपूर तालुक्याला वेठीस धरून कसा करू शकता? हा मला पडलेला एक प्रश्न आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनाही माझ्या विरोधात ताकद लावावी लागली यातच आपला विजय आहे. सर्व सदस्यांनी एकमताने माझी गटनेतेपदी निवड केली. गटनेता म्हणून आपण बजावलेल्या ‘व्हीप’चा अनादर करीत सौ. संगीता शिंदे यांनी विरोधी गटात जाऊन अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात पक्षविरोधी कृती केल्याबद्दल तक्रार करणार असल्याचे सौ. मुरकुटे यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com