Tuesday, April 23, 2024
Homeनगरश्रीरामपुरात काळजी वाढली

श्रीरामपुरात काळजी वाढली

गोवर्धनपूरच्या रूग्णाची प्रकृती चिंताजनक

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील गोवर्धन येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या नातेवाईकांसह ज्या डॉक्टरांकडे सदर व्यक्तीचे उपचार करण्यात आले ते डॉक्टर तसेच त्या व्यक्तीच्या संपर्कातील 21 व्यक्तींना तात्काळ तपासणीसाठी अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. वसंतराव जमदाडे यांनी दिली.

दरम्यान, या रूग्णाची प्रतिकारशक्ती कमी असल्याने प्रकृति चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. याबाबत या रूग्णाच्या वडिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सदरची व्यक्ती दिव्यांग असून आजारपणासाठी एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती. सदर व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग कशामुळे झाला याबाबत आरोग्य यंत्रणेमार्फत शोध सुरू आहे. सदर परिसर कोरोना बाधीत म्हणून घोषित करण्यात आला आहे. या गावाची लोकसंख्या 750 व कुटूंबाची संख्या 140 आहे.

- Advertisement -

चार आरोग्य पथकामार्फत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजगुरू यांचे पथक शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणत्याही व्यक्तीने अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, विनाकारण गर्दी करू नये, विनाकारण रस्त्यावर येऊ नये.

तसेच आपल्या परिसरामध्ये बाहेरच्या राज्यातून, जिल्ह्यातून तसेच तालुक्यातून कोणतीही व्यक्ती येऊन वास्तव्य करत असेल, त्याबद्दल प्रशासनास तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी केले आहे. वरील सर्व परिस्थितीवर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंतराव जमदाडे लक्ष ठेवून आहेत.

तरीही नागरिकांनी घाबरून जायचे कारण नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका आरोग्यधिकारी डॉ. मोहन शिंदे यांचेशी संवाद साधून शासनाच्या काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रांताधिकारी पवार व तहसीलदार पाटील व आरोग्यधिकारी डॉ वसंत जमधडे, डॉ मोहन शिंदे यांनी शहरासह तालुक्यातील सर्व खाजगी व शासकीय दवाखाने व डॉक्टरांना तसे अवगत केले आहे.

पाच वर्षांवरील कोणाला अचानक ताप आला, घशात खवखवणे, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे असा त्रास होत असेल आणि पाच वर्षाखालील रुग्णास न्यूमोनिया झाला असेल आणि अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज वाटत असेल तर डॉक्टरांनी त्यांची सर्व माहिती स्वतःच्या रजिस्टर मध्ये नोंदवावी. व तात्काळ आरोग्य विभागासह प्रशासनास माहिती द्यावी.

अशा रुग्णांना ज्या ठिकाणी 100 किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण दाखल करण्याची व कोरोना उपचाराची सोय आहे तेथे भरती करावयाचे आहे. तेथे त्यांच्या घशातील स्राव काढून तपासणीसाठी पाठवला जाईल. अहवाल येईपर्यंत आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे उपचार करावेत. अहवाल जर कोरोना किंवा एचवन एन वन आला तर त्या पद्धतीने उपचार करावेत. अहवाल निगेटिव्ह असेल तर जनरल वॉर्डात घेवून योग्य उपचार करावेत, अशा मार्गदर्शक सूचना आहेत.

दोन कोरोना संशयीत सिव्हीलमधून गायब

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाची चाचणी करण्यासाठी श्रीरामपुरहून आलेल्या दोघे कोरोना संशयीत जिल्हा रुग्णालयात केस पेपर काढून ऐनवेळी बहाणा करत गायब झाले. हा प्रकार काल (मंगळवारी) सायंकाळच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडला असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्रपणे कोरोना कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

त्या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णांच्या घशातील स्त्राव काढून तो तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेत पाठविण्यात येतो. या ठिकाणी मंगळवारी श्रीरामपूरचे दोघे कोरोना संशयीत आले होते. त्यांनी कोरोनाची तपासणी करावयाची सांगत त्यासाठी केसपेपर काढला.

मात्र, ऐनवेळी उपस्थित डॉक्टरांना वडिल घेऊन येतो, असा बहाणा करत जिल्हा रुग्णालयातून काढता पाय घेतला. कोरोनाची तपासणी करण्यासाठी आलेले अचानक गायब झाल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासन देखील आवक झाले. ते दोघे कोठे आहेत, याची शोधा शोध झाली. मात्र, त्यानंतर ते मिळून आले नाहीत. त्यानंतर हा प्रकार तोफखाना पोलीसांना आणि जिल्हा पोलीस कंट्रोल रुमला कळविण्यात आला. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची नोंद देण्यात आली आहे. रात्री उशीरापर्यंत श्रीरामपूरच्या ‘त्या’ संशयीतांचा ठावठिकाणा लागला नव्हता.

अनेक गावाने स्वतःहून केले लॉकडाऊन
तालुक्यातील गोवर्धन सारख्या गावांमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरातील गोंडेगाव, नायगाव, जाफराबाद, माळेवाडी, माळवाडगाव, शिरसगाव परिसर, मातापूर, कारेगाव, पढेगाव परिसर, बेलापूर भागात ग्रामस्थांनी आपल्या गावात येणारे सर्व रस्ते बंद करून लॉकडाऊन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या