शालेय विद्यार्थ्यांना मिळणार पोषण आहाराचा शिधा !
स्थानिक बातम्या

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार पोषण आहाराचा शिधा !

Sarvmat Digital

4 लाख 70 हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ : पालकांवर शालेय पोषण आहार नेण्याची जबाबदारी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहाराचा शिधा आता विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालकांना शासनाने दिले आहेत. या आहारांतर्गत येणारा तांदूळ, डाळी, कडधान्ये शिक्षकांनी विद्यार्थी संख्याच्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या पालकांना वितरित करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 4 लाख 70 हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असला तरी शिक्षकांचे काम मात्र वाढणार आहे.

कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व खाजगी व सरकारी शाळा 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अंगणवाड्याही बंद आहेत.

त्यामुळे विद्यार्थी व लहान बालके पोषण आहारापासून वंचित राहत असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील विद्यार्थ्यांचे पोषण होण्याच्या दृष्टीने आहार देणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक, योजनेचे काम पाहणारे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तांदूळ व डाळी, कडधान्यांचा शिल्लक साथ विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्याचे नियोजन करावे.

या वाटपाबाबत शाळा स्तरावरून प्रसिद्धी करण्यात यावी. हे धान्य घेऊन जाण्यासाठी शाळेत गर्दी होणार याही याची दक्षता घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे. उपस्थित विद्यार्थी अथवा पालकांना एकमेकांपासून रांगेत 1 मीटर अंतरावर उभे करावे. विद्यार्थी अथवा पालक आजारी असल्यास अशा विद्यार्थी अथवा पालकाचे धान्य घरपोच करण्याचे नियोजन करावे. तांदूळ, डाळी वाटप करताना जिल्हाधिकार्‍यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन याबाबत काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक रमाकांत काटमोरे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com