‘सारी’ : तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर

‘सारी’ : तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर

सर्दी, खोकला, घशात खवखव, श्वनाचा त्रास, न्युमोनिया असणार्‍या रुग्णाची सरकारी आरोग्य संस्थेत होणारी तपासणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेजारच्या जिल्ह्यात श्वसनाचा त्रास जाणवणारे ‘सारी’ आजाराचे रुग्ण आढळून आलेले आहेत. असे रुग्ण जिल्ह्यात वाढू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलत कार्यवाहीस सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांच्या शोधाबरोबरच आता सारीचे रुग्णांचेही तात्काळ निदान व्हावे, यासाठी आरोग्य यंत्रणा सरसावली आहे.

आता तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर (सीसीसी) कार्यान्वित करण्यात येणार असून ज्या रुग्णांना श्वनाचा त्रास, न्युमोनिया, सर्दी, खोकला, घशात खवखव असा त्रास असेल अशा प्रत्येक रुग्णाची तपासणी तालुका पातळीवरी सीसीसी मधून होणार आहे. त्यानंतर या रुग्णांची लक्षणे पाहून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. तसेच त्यांची कोरोनासाठीची चाचणीही केली जाणार आहे. संबंधीत रुग्णांना प्रत्येक टप्प्यावर योग्य उपचार मिळतील, असे नियोजन तालुका आणि जिल्हा पातळीवर करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच जिल्ह्यातील सर्व खाजगी व्यवसायिक डॉक्टर यांना त्यांचे दवाखाना अथवा रुग्णालयात आलेल्या बाह्यरुग्ण व आंतररुग्णामध्ये खोकला, ताप, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे असणारे रुग्ण आढळल्यास, त्यांना त्वरीत जिल्हा रुग्णालय नगर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्याचे आदेश जारी केले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आदेश जारी करुन त्याचे उल्लंघन करणार्‍या खासगी व्यावसायिक डॉक्टरांवर कार्यवाही करण्यात येईल, असेही स्पष्ट केले होते. आता यासंदर्भात अधिक सुसूत्रता यावी आणि सारीचा प्रसार आणि प्रादुर्भाव वेळीच रोखता यावा, यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत अशा रुग्णांची तपासणी सीसीसी मार्फत केली जाणार आहे.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी रविवारी सायंकाळी यासंदर्भात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून याबाबत आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त श्रीकांत म्याकलवार, प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मांडगे आदी यावेळी उपस्थित होते.

असे आहेत ‘सारी’चे लक्षणे
केंद्र व राज्य शासनाने ज्यांना श्वसन विकाराचा तीव्र त्रास होत आहे, अशा नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार रुग्णाची व्याख्या खालील प्रमाणे आहे. ज्या 5 वर्षांवरील सर्व व्यक्तींना अचानक सुरु झालेला 38 अंश सेल्सीयस ताप असेल, खोकला, घशात खवखव जाणवत असेल, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासत असेल तसेच याशिवाय, ज्या 5 वर्षाखालील मुलांना न्यूमोनिया असेल आणि रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासत असेल अशा व्यक्तींना सारी रुग्ण म्हणून ओळखले जाते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com