संगमनेर : सभापती सुनंदाताई जोर्वेकर तर उपसभापती नवनाथ अरगडे
स्थानिक बातम्या

संगमनेर : सभापती सुनंदाताई जोर्वेकर तर उपसभापती नवनाथ अरगडे

Sarvmat Digital

विरोधकांच्या निषेधानंतर वाजले फटाके

संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर पंचायत समितीच्या सभापतिपदी सुंनदाताई जोर्वेकर तर उपसभापतिपदी नवनाथ अरगडे यांची निवड झाली आहे. मात्र या निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म न पाळल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी तिव्र संताप व्यक्त करत कॉँग्रेसचा निषेध नोंदवला आहे. पंचायत समितीच्या आवारात विरोधकांच्या निषेधानंतर सत्ताधार्‍यांनी जोरदार फटाके फोडले.

पंचायत समिती सभापती पदासाठी काल पंचायत समितीच्या सभागृहात पिठासन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. सुरवातीला अर्ज दाखलच्या वेळी कांँग्रेसकडून सभापतिपदासाठी सुनंदा बाळासाहेब जोर्वेकर यांनी दोन अर्ज तर शिवसेनेच्या आशा पंढरीनाथ इल्हे यांनी एक अर्ज दाखल केला. उपसभापतिपदासाठी काँग्रेसकडून नवनाथ धोंडीबा अरगडे तर शिवसेनेकडून अशोक बबन सातपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी 3 वाजता अर्ज छाननी झाली.

त्यानंतर सभापती व उपसभापती पदासाठी हात वर करून सरळ मतदान झाले. यावेळी सभापतिपदासाठी सुनंदा जोर्वेकर यांना 13 मते तर विरोधी आशा इल्हे यांना 5 मते मिळाली. तर उपसभापतिपदासाठी नवनाथ अरगडे यांना 13 मते तर अशोक सातपुते यांना 5 मते मिळाली.
मतदानानंतर पिठासन अधिकारी तथा निवडणूक उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील यांनी सभापतिपदी सुनंदा बाळासाहेब जोर्वेकर व उपसभापतिपदी नवनाथ धोंडीबा अरगडे यांची निवड झाल्याचे घोषित केले. निवडणूक कामी निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, सहाय्यक महेश आगळे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांचे सहाय्य लाभले.

निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर शिवसेनेचे सदस्य अशोक सातपुते, विखे गटाचे सदस्य दीपाली डेंगळे, निवृत्ती सांगळे, भाजपच्या सदस्या सुनीता कानवडे यांनी संयुक्तरित्या कॉँग्रेसच्या धोरणांचा निषेध नोंदवत सभागृह सोडले. पाचही सदस्य व कार्यकर्ते काँग्रेस विरोधी घोषणा देत सभागृहातून बाहेर पडले. पंचायत समितीच्या कार्यालयाच्या बाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोेरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे आम्ही कॉँग्रेसच्या धोरणाचा निषेध करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान निवडीनंतर काँग्रेस सदस्य, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पंचायत समितीसमोर जोरदार फटाके फोडत विजयी जल्लोष केला. यावेळी नूतन सभापती सुनंदाताई जोर्वेकर म्हणाल्या, ना. थोरात यांनी दिलेल्या संधीचे आपण निश्चीत सोने करू. तालुक्याच्या विकासात्मक कामाला प्राधान्य देऊ. सर्वांना सोबत घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबध्द राहू. नूतन उपसभापती नवनाथ अरगडे म्हणाले, उपसभापती म्हणून सलग दुसर्‍यांदा संधी मिळाली. ना. बाळासाहेब थोरात यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवू.

दरम्यान ना. बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात नूतन सभापती सुनंदाताई जोर्वेकर व उपसभापती नवनाथ अरगडे यांचा थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, जिल्हा परिषदेचे कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी सत्कार केला. यावेळी पंचायत समिती सदस्या निशाताई कोकणे, किरण मिंडे, प्रियंका गडगे, बेबीताई थोरात, स्वाती मोरे, संगीता कुदनर, रमेश गुंजाळ, सुभाष सांगळे, दत्तु कोकणे, सोमनाथ गोडसे, सचिन खेमनर, दादासाहेब कुटे, तात्या कुटे आदी उपस्थित होते.

काँग्रेसची भूमिका सर्वसमावेशक-ओहोळ
संगमनेर पंचायत समितीच्या सभापती- उपसभापती निवडणुकीत काँग्रेसची भूमिका ही सर्वसमावेशक राहिली आहे. वंचित घटकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेत त्यांना आत्मविश्वास दिला आहे. महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी पुरोगामी विचारांच्या महाविकास आघाडीला साथ दिली आहे. कुंभार समाजाला सभापतिपद बहाल करत एक प्रकारे त्यांचा सन्मानच वाढवला आहे. असे पद कधी स्वातंत्र्य काळापासून या समाजाला मिळाले नाही. पुरोगामी विचारांना साथ देण्यासाठी ना. थोरात यांनी टाकलेले हे एक पाऊल आहे. या निर्णयांमुळे संगमनेरचा वेगळा पॅटर्न हा समाजकारण व राजकारणात दिशादर्शक ठरला आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यात ना. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीही अनेक विकासात्मक कामे झाली, आगामी काळातही ती होतील, असा विश्वास संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी व्यक्त केला आहे.

डेंगळे व सांगळे यांचे सदस्यत्व धोक्यात का?
संगमनेर पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे पक्षप्रतोद विष्णूपंत रहाटळ यांनी काँग्रेस सदस्यांना पक्षाचा व्हीप बजावला. दरम्यान निवडणुकीवेळी काँग्रेसचे (विखे गट) दीपाली भाऊसाहेब डेंगळे (आश्वी बु॥ गण) व निवृत्ती उर्फ गुलाब बाबुराव सांगळे (आश्वी खुर्द गण) यांनी सभापती, उपसभापतीच्या निवडीवेळी विरोधात मतदान नोंदविले. त्यामुळे एक प्रकारे विखे गटाच्या दोन सदस्यांनी पक्षाचा व्हीप नाकारल्याचे दिसून आले. पक्ष व्हीप नाकारल्याने त्यांच्या सदस्यपदावर गदा येऊ शकते. कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसची पं. स. व जि. प. गट सदस्यांची गटनोंदणी मा. जिल्हाधिकार्‍यांसमोर झाली होती. डेंगळे व सांगळे यांनी काँग्रेस पक्षाचा व्हीप नाकारल्याने त्यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे.

काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही- सातपुते
अडीच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती त्यावेळी शिवसेना, काँग्रेस वेगवेगळे लढले. मात्र महायुतीचा धर्म पाळून भाजप-शिवसेना एकत्र लढली. त्यामध्ये शिवसेनेच्या काही जागांना विरोध मिळाला. त्यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा निवड होऊ घातली. आणि राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीचा फार्म्युला पाळण्यात आला. शिवसेना-राष्ट्रवादी- काँंग्रेस यांच्या एकत्रित महाविकास आघाडीची सत्ता आली. आता पंचायत समितीत काम करत असतांना तालुक्याचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री म्हणून या महाविकास आघाडीत शपथ घेतली. आणि आता ते राज्याला सांगतात की महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा. आणि या ठिकाणी स्वत:च्या तालुक्यात कोणत्याही प्रकारचा धर्म न पाळता स्वत:चीच सत्ता स्थापन केली. आम्ही ना. थोरात यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांच्याकडून सांगण्यात येत होते, मिटींगमध्ये आहे.

आज निर्णय देतो, उद्या निर्णय देतोे अशा पध्दतीने निर्णय न देता आज त्यांनी स्वत:ची सत्ता येथे आणली. शिवसेनेच्या जोेरावर आज ते पदावर आहेत. त्या पदाला आज जागेचा विचार केला तर आमची जागा किती महत्त्वाची आहे. त्यांची किती महत्त्वाची आहे. याचा विचार त्यांनी करायला हवा, अशी येथील शिवसैनिकांची अपेक्षा होती. जरी आम्ही विरोधाने लढलो परंतु आज कुठेतरी एकत्रितपणा आला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलो. येथून पुढे तरी एकमेकांचे वैमनस्य थांबवून एकत्रित राहू, मात्र तसे झाले नाही. या निवडणुकीत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढण्याचे ठरविले. मात्र येथे थोरात यांनी महाविकास आघाडीचा बिमोड केला आहे. यापूर्वी पंचायत समितीमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम केले त्याच ताकदीने आगामी काळात विरोधी पक्षनेता म्हणून आपण काम करणार असल्याचे शिवसेनेचे सदस्य अशोक सातपुते यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com