मित्रानेच दिली सराफाला लुटण्याची सुपारी
स्थानिक बातम्या

मित्रानेच दिली सराफाला लुटण्याची सुपारी

Sarvmat Digital

अहमदनगर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील सोनार ज्ञानेश्वर अनिल चिंतामणी (वय- 34 ) यांना लुटण्याचे त्यांचा मित्र गणेश राजेंद्र गायकवाड (वय- 33 रा. घुलेवाडी ता. संगमनेर) याने अन्य मित्रांच्या साथीने ठरविले. तशी सुपारीच गणेश याने अन्य साथीदारांना दिली. चिंतामणी यांना लुटण्याच्या नादात एकाचा जीव गेलाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तिघांना जेरबंद केले. तर, अन्य पसार झालेल्या तिघांचा कसून शोध पोलिस घेत आहे. गणेश राजेंद्र गायकवाड, दिपक विनायक कोळेकर (वय- 34 रा. नाशिक), भरत विष्णु पाटील (वय- 26 रा. पंचवटी, नाशिक) असे अटक केलेल्या लुटारूचे नावे आहे. तर, अविनाश जगन्नाथ मारके (रा. घुलेवाडी ता. संगमनेर), समाधान कुंडलिक गोडसे (रा. परीते सोलापूर, हल्ली रा. वाघोली, पुणे), निलेश (पूर्ण नाव माहित नाही, रा. नाशिक) हे पसार झाले आहेत.

ज्ञानेश्वर चिंतामणी हे 5 जानेवारीला सोन्याची दुकान बंद करून घरी आले. घरासमोर चारचाकी उभी करून घरात जाण्यापूर्वीच चोरट्यांनी त्यांच्या चारचाकीच्या काचा फोडून तीन किलो चांदी चोरली. हा घटनाक्रम सुरू असताना चिंतामणी यांच्या मदतीला आलेल्या तिघांवर लुटारूंनी गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. यामध्ये अविनाश सुभाष शर्मा (रा. गुंजाळवाडी ता. संगमनेर) यांचा जीव गेला होता. याप्रकरणी संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथके कार्यरत करण्यात आली आहेत. संगमनेर व परिसरातील हॉटेल, धाबे, पेट्रोलपंपाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासाअंती सदरचा गुन्हा ज्ञानेश्वर चिंतामणी यांचा मित्र गणेश गायकवाड याने अन्य साथीदारांच्या मदतीने केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. मिळालेल्या महितीच्या आधारे पथकाने गायकवाड याला घुलेवाडी येथे अटक केली. तर, त्याचे अन्य साथीदारांपैकी दिपक कोळेकर, भरत पाटील यांना नाशिकमधून अटक केली. तर अन्य तिन पसार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस घेत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com