संगमनेर पुन्हा हादरले ! ; एकाच दिवसात 07 करोना पॉझिटिव्ह

jalgaon-digital
4 Min Read

हॉटस्पॉट 22 मे पर्यंत वाढ, जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या 51वर

अहमदनगर, संगमनेर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील संगमनेरमधील सात व्यक्तींना करोनाची लागण झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 51वर पोहचली आहे. संगमनेर येथील 59 वर्षीय महिला आणि संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जण असे पाचजण करोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच करोनाचे संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त येऊन धडकताच संगनमनेरकर हादरले आहेत. दरम्यान, हॉटस्पॉट क्षेत्र 22 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या येण्या-जाण्यास तसेच सर्व प्रकारच्या वाहतुकीस निर्बंध करण्यात आले आहेत.

यापूर्वी संगमनेरात 4-4 पाझिटिव्ह रूग्ण आढळले होते. सर्वांच्या प्रयत्नाने या रूग्णांनी करोनावर विजय मिळविला. संगमनेरकरांना दिलासा मिळेल असे वाटत असतानाच गुरूवारी धांदरफळ येथील एका वृध्दाचा करोनामुळे मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल अद्याप प्रलंबित असून धांदरफळ येथील सहा बाधित व्यक्ती या मृत व्यक्तीच्या नात्यातील आहेत. तर संगमनेर येथील महिलेला न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिचा घशातील स्त्राव चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला होता. त्यात या महिलेला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

धांदरफळ येथील बाधित यामध्ये 29 वर्षीय आणि पंधरा वर्षीय युवक तर 25 आणि 19 वर्षीय युवतीचा समावेश आहे. यासह 5 वर्षे मुलाचा आणि व्यक्तीचा रात्री उशीरा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे संगमनेरकरांची चिंता वाढली आहे. तर प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या 34 अहवालापैकी 28 अहवाल शुक्रवारी रात्री उशीरा प्राप्त झाले. त्यात, 23 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून पाचजण करोना बाधित असल्याचे आढळून आले.

23 अहवाल निगेटिव्ह आले आहेत त्यात धांदरफळ येथील 8, संगमनेर येथील 4, पारनेर 1, राहाता 1, अकोले 01, नगर 2, जामखेड 2, कोपरगाव 1 आणि श्रीरामपूर येथील तिघांच्या अहवालाचा समावेश आहे.

संगमनेरातील मोंढा बंद
करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून संगमनेर शहरातील भरणारा भाजीपाला मोंढा शनिवार 9 मे 2020 पासून (होलसेल/घाऊक विक्री ) पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत आहे, शहरात कोठेही भाजीपाला मोंढा (होलसेल भाजीपाला विक्री) भरणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, तहसीलदार अमोल निकम यांनी दिला आहे.

शेतकर्‍यांना अशी मुभा..
दरम्यान, शेतकर्‍यांना त्यांचा भाजीपाला व फळे किरकोळ विक्रीसाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलल्या ठिकाणी ग्राहकांना सामाजिक अंतर राखून किंवा हातगाडीद्वारे विक्रीस मुभा राहिल, असे स्पष्ट करण्यात आले.

संगमनेरच्या आकडा वाढण्याची शक्यता
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात करोनाची आकडेवारी स्थिर असताना अचानक गुरूवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीपैकी चौघे करोना बाधित झाले आहेत. दरम्यान मृत व्यक्तीचा खासगी प्रयोग शाळेतील अहवाल पॉझिटिव्ह आला असून शासकीय प्रयोग शाळेतील अहवाल बाकी आहे. यामुळे संगमनेरमधील बाधितांचा आकडा वाढण्याची आहे. यासह बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी किती व्यक्त आहेत. याचा तपास करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.

संगमनेरातील इस्लामपुरा व अन्य भाग तसेच कुरण व धांदरफळमध्ये निर्बंध
या घटनेने प्रशासनही सतर्क झाले असून संगमनेर शहरातील इस्लामपूरा, कुरणरोड, बीलालनगर, अपनानगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, तसेच तालुक्यातील कुरण, धांदरफळ बुद्रुक हे क्षेत्र हॉटस्पॉट क्षेत्र म्हणून व सदर क्षेत्राच्या मध्यबिंदू पासून जवळपास 2 किमीचा परिसर हा कोरो क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रातील सर्व अस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू इत्यादी दि. 9 एप्रिल ते 22 एप्रिल 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. या क्षेत्रात नागरिकांना येण्या-जाण्यास आणि वाहतुकीच निर्बंध घालण्यात आले आहेत.

संगमनेर डॉक्टरांचे अहवाल निगेटिव्ह
शहरातील खाजगी डॉक्टर व शासकीय डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली. त्यांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *