संगमनेर : पहिला करोनाबळी
स्थानिक बातम्या

संगमनेर : पहिला करोनाबळी

Sarvmat Digital

3 खासगी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्नीशियनसह 17 जण क्वारंटाईन

संगमनेर (प्रतिनिधी)– संगमनेर करोनामुक्त होण्याच्या टप्प्यात असतानाच काल तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील एक व्यक्ती करोना आजाराचा बळी ठरल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेले 3 खाजगी डॉक्टर, एक वैद्यकीय अधिकारी व लॅब टेक्नीशियन यांच्यासह 17 जणांना क्वारंटाईन केले असून त्यांना नगर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

धांदरफळ बुद्रूक येथील एक 67 वर्षीय व्यक्ती तीन दिवसांपूर्वी संगमनेरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती. सदर व्यक्तीची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी याबाबतची माहिती घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकार्‍यांना दिली. त्यानंतर सदर व्यक्तीचा स्वॅब घेण्यात येऊन त्यास होम क्वारंटाईन करण्यात आले.

सदर स्वॅब तपासणीसाठी मुंबई येथील एसआरएल लॅबकडे पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल गुरुवारी दुपारी प्रशासनाला प्राप्त झाला. सदर अहवाल पॉझिटिव्ह होता. मात्र तत्पूर्वी सदर व्यक्तीचा गुरुवारी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान घरीच मृत्यू झाला.

संगमनेर हे गुरुवारी रात्री 12 वाजता हॉटस्पॉटमधून बाहेर येणार होते. असे असले तरी केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन सुरु आहेच. काल दुपारी करोना बाधीत रुग्णाचा अहवाल संगमनेरात धडकताच प्रशासनाची झोप उडाली. दरम्यान माहिती मिळताच प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी तातडीने धांदरफळ बुद्रूक गाठले.

मयत व्यक्तीवर धांदरफळ बुद्रूक येथे शासकीय निकषाप्रमाणे सायंकाळी 7.30 वाजता दफनविधी करण्यात आला. दफनविधीपूर्वी पुन्हा आरोग्य यंत्रणेने मयत व्यक्तीचा स्वॅब घेतला असून तो पुढील तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेत पाठविण्यात आला आहे.

सदर मयत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली. तूर्त एकूण 17 व्यक्ती सदर व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे आढळून आले. त्यामध्ये संगमनेरातील नामांकित तीन खाजगी डॉक्टर, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व लॅब टेक्नीशियन यांचा समावेश आहे. सदर 17 व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात येणार असल्याने त्यांना रात्री उशीरा नगर येथे रवाना करण्यात आले, अशी माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.

स्वॅब टेस्टिंग मोहिम
नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्वॅब टेस्टिंग मोहिम आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे. ताप, खोकला, सर्दी, डोके दुखणे, चक्कर येणे, घसा खवखवणे ही लक्षणे असलेल्या व्यक्तींकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. याच मोहिमेतून धांदरफळचा रुग्ण निदर्शनास आला. संगमनेर शहर व तालुका येथील खाजगी डॉक्टरांना याबाबत माहिती देण्यात आली होती. असे रुग्ण आल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयास माहिती द्यावी, धांदरफळच्या रुग्णाबाबत देखील तेच झाले. त्याने खाजगी रुग्णालयात तपासणी केली. मात्र खाजगी डॉक्टरांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय अधिकार्‍यांना माहिती दिली. त्यामुळे हा रुग्ण करोना बाधीत असल्याचे पुढे आले.

संगमनेरकरांच्या चिंतेत वाढ
मयत व्यक्ती अंडी विकण्याचा व्यवसाय करत होती. त्यामुळे सदर व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आल्याची बाब पुढे येत आहे. सदर व्यक्तीचे गावात अंडी विकण्याचे दुकान आहे. तसेच संगमनेरलाही ‘होम डिलेव्हरी’ देत असल्याची चर्चाही पुढे आली आहे. त्यामुळे सदर व्यक्ती संगमनेरात किती व्यक्तींच्या संपर्कात आली आणि त्या व्यक्ती कुणाच्या संपर्कात आल्या, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न संगमनेरात दिवसभर सुरु होता. या घटनेने संगमनेरकरांच्या चिंतेत वाढ केली आहे हे मात्र निश्चित.

धांदरफळ बुद्रुक गावठाण कंटेनमेंट झोन
धांदरफळ बुद्रुक मधील गावठाण एरिया हा प्रतिबंधात्मक क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषीत करण्यात आला आहे. या परिसरात एकूण 1700 लोकसंख्या आहे. या सर्व ग्रामस्थांची तपासणी मोहिम आरोग्य विभागामार्फत आजपासून सुरु करण्यात येणार आहे.

‘त्या’ व्यक्तीने केला होता विरोध
धांदरफळ येथील व्यक्तीचा शासकीय वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्वॅब घेतल्यानंतर त्यास संशयीत म्हणून क्वारंटाईन करण्यात येवून नगर येथे पाठविण्यात येणार होते. तसा निर्णय झाला मात्र सदर व्यक्तीने त्यास विरोध केला. त्यानंतर त्यास घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते.

मृत व्यक्तीचा स्त्राव नगर प्रशासनाकडून तपासणीला
संगमनेरमध्ये एका मृत व्यक्तीचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईच्या प्रयोग शाळेने हा अहवाल पॉझिटिव्ह दिला, तिला सरकारची मान्यता आहे. मात्र, हा अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत संबंधीत प्रयोग शाळेत जाणे गरजेचे आहे. अशा प्रकारे कोणीही व्यक्ती अथवा रुग्णालय परस्पर करोनाचा स्त्राव अहवाल तपासणीसाठी पाठवू शकत नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुरंबीकर यांनी सांगितले. त्यामुळे नगर प्रशासनाकडून या व्यक्तीचा स्त्राव तपासणीसाठी पाठविला. त्याचा अहवाल रात्री उशीरा अथवा आज प्राप्त होणे अपेक्षित आहे.

अकोलेतील एका डॉक्टरला तपासणीसाठी नगरला हलविले
संगमनेरमध्ये एका मृत व्यक्तीने अकोले तालुक्यातील एका गावातील डॉक्टरकडे उपचार घेतले होते. पण त्या व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने या डॉक्टरला तपासणीसाठी नगरला हलविण्यात आले आहे. तसेच या डॉक्टरकडे उपचार घेतलेल्या अन्य रूग्णांचाही तपास सुरू करण्यात आला असून त्यांनाही तपासणीसाठी नेण्याची कार्यवाही सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com