Friday, April 26, 2024
Homeनगरबेफाम ट्रकचालकाने घडवला थरार

बेफाम ट्रकचालकाने घडवला थरार

अनेकांना कट मारून वेगाने पळून जाणारा देशी दारुचा ट्रक शेवगावमध्ये पकडला

नेवासा, शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – कोपरगाव येथून नांदेडकडे देशी दारू घेऊन जाणार्‍या मालट्रकने श्रीरामपूर ते नेवासा दरम्यान रस्त्यावर अनेकांना कट मारला. भरधाव वेगाने पळून जाणार्‍या या ट्रकचा नेवासा पोलीस व पत्रकारांनी चित्तथरारक पाठलाग करून शेवगावमध्ये पकडण्यात यश मिळाले.

- Advertisement -

श्रीरामपूरहून नेवाशाकडे मालट्रक (एम एच 44/9411) भरधाव येत आहे. त्याने टाकळीभान येथे एकास कट मारुन तो नेवाशाकडे येत असल्याची सूचना नेवाशातील पत्रकारांना मिळाली. तत्पूर्वी या ट्रकने श्रीरामपूरकडे जात असलेल्या नेवासा बुद्रुक येथे शिवनेरी ट्रान्सपोर्टच्या शिवनेरी लक्झरी बसला समोरासमोर कट मारला. यात बसचे मोठे नुकसान झाले. तसेच श्रीरामपूर येथील बंटी आछडा यांच्या मालकीच्या (एमएच 14 बीजे 5299) या ट्रकला नेवासा बुद्रुक येथे मेन रस्त्यावर समोरासमोर धडक दिली. त्यात ट्रकचे नुकसान झाले असून ट्रक चालक रिजवान शेख जखमी झाला. त्याचा डोक्याला मार लागला आहे.

त्यानंतर नेवासा पोलीस व पत्रकारांनी नेवासा शहरात हा ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला परंतु दोन पत्रकारांनाही कट मारून ट्रक चालकाने पलायन केले. नेवासा बाजार समितीकडून खडका फाट्याकडे जाणार्‍या रस्त्याने जाऊन हा ट्रक भरधाव वेगाने नेवासा फाट्याकडे आला. नेवासा फाट्याकडून भेंडा कडे जात असताना पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी भेंडा ग्रामस्थांना सूचना दिली. त्यानुसार भेंडा पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर अडथळे निर्माण (बॅरिकेड) करण्यात आले. परंतु हे आडथळे तोडून ट्रक भरधाव वेगाने निघून गेला.

दरम्यान या ट्रकचा पुढचा टायर फुटला तरी सुद्धा केवळ डिस्क वर ट्रक चालवत नेला.कुकाणा येथेही पोलीस व ग्रामस्थांनी बॅरिकेड लावून व रस्त्यावर लाकडे टाकून आडथळे निर्माण केले. तेही तोडून ट्रकने पलायन केले. डांबरी रस्त्यावर आदळून होणारा आवाज आणि पोलिसांचा होत असलेल्या पाठलाग यामुळे शेवगाव पर्यंतच्या सर्व गावातील लोक रस्त्यावर आले होते.

कुकाणा सोडल्यानंतर मात्र सदर ट्रक शेवगावकडे जाणार हे ओळखुन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्याशी संपर्क साधून शेवगाव बस स्टँडजवळ जिल्हा बँकेसमोर बॅरिकेड लावण्यात आले असता या ट्रक चालकाने हे अडथळे सुद्धा तोडून पळून जात असताना टर्न न बसल्याने हा देशी दारूचे बॉक्स भरलेला ट्रक शेवगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेश व्दाराशेजारी असलेल्या शिवनेरी व आशिया मोबाईल शॉपी या दुकानामध्ये घातली. यामध्ये दुकानांचे व ट्रकच्या पुढील भागाचे नुकसान झाले. यामध्ये चालक जखमी झाला असून त्याला ट्रकमधून ओढून काढावे लागले. चालकास शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, नेवासा चे पोलीस निरीक्षक रणजित डेरे व शेवंगावचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे उपस्थितीत अपघातग्रस्त ट्रक (एमएच 44 / 9411) मधील देशी दारूचे बॉक्स दुसर्‍या ट्रकमध्ये शिफ्ट करून नेवासा पोलीस ठाण्यात आणण्याचे काम सुरू होते. या ट्रक मध्ये देशी दारूचे 700 ते 800 बॉक्स असल्याचे समजते.

नेवासा ते शेवगाव दरम्यान पाठलाग करण्यात नेवासा पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, कॉन्स्टेबल संभाजी गर्जे, मोहन गायकवाड, अंबादास गिते,जयवंत तोडमल, अशोक कुदळे, पत्रकार शंकर नाबदे, पवन गरुड, सुखदेव फुलारी, सुनील गर्जे, सोपान महापूर यांचेसह नेवासा भेंडा कुकाणा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दरम्यान सदर ट्रकचालकाने एवढ्या वेगाने बेदरकार ट्रक का चालवला? ट्रकमधील दारु अवैध होती का? तो नशेत होता का? की एक अपघात केल्यावर होत असलेल्या पाठलागामुळे घाबरुन तो एवढ्या वेगाने अविचाराने जात होता? हे तो शुद्धीवर आल्यावर त्याच्या चौकशीतूनच स्पष्ट होणार आहे. सलदैवाने त्याने घडवलेल्या अपघातांमुळे कोणाचा बळी गेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या