ओबीसी व मराठा समाजांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मुस्लीम आरक्षण देणार – ना. थोरात
स्थानिक बातम्या

ओबीसी व मराठा समाजांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मुस्लीम आरक्षण देणार – ना. थोरात

Sarvmat Digital

संगमनेर (प्रतिनिधी)-  आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याचे विधेयकात रूपांतर करून कायदा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आमचे सरकार कोर्टात टिकेल असे ओबीसी व मराठा सामाजांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मुस्लीम समाजाला आरक्षण देणार, हीच काँग्रेसची भूमिका असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलतांना सांगितले.

थोरात साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हा. चेअरमन निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी ना. थोरात बोलत होते. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केलेल्या काव्य वाचन कार्यक्रमात तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने शेतकरी आत्महत्येवर कविता सादर केली अन त्याच दिवशी या मुलाच्या वडिलांनी विषप्रशान करुन आत्महत्या केली.

याबाबत थोरात म्हणाले, शेतकर्‍याने केलेली आत्महत्या दुर्दैवी आहे. लोकशाही आघाडी सरकार शेतकर्‍यांना ताकद देण्यासाठी निश्चित प्रयत्न करत आहे. शेतकर्‍यांना कोणताही त्रास न होता शेतकर्‍याच्या खात्यावर आम्ही कर्जमाफी करत पैसे दिले आहे. शेतकर्‍याला दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे असतानाही शेतकर्‍याने का आत्महत्या केली नेमक काय चुकतंय याचा विचार आम्हाला करावा लागेल असेही थोरात म्हणाले.

सरकारने मदत दिल्याशिवाय देशात कुठेही शेतकरी उभा राहू शकत नाही. तरीही आपले मनोबल पक्के ठेवून आणि समस्यांना सामारेे जावे. कुटुंब आपल्या पाठीमागे आहे सरकारही त्यांच्या पाठीमागे उभे राहत असल्याचे ते म्हणाले.

पूर्वीच्या सरकारने दीड लाखाची मदत दिली होती. आधीच्या सरकारमध्ये जाचक अटी होत्या मात्र आमची कर्जमाफी एकदम सोपी आहे. लवकरच नियमित कर्ज भरणारे आणि दोन लाखाच्या वर कर्ज असणार्‍यांना दिलासा देणार असून पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात होणार आहे. खूप मोठी संख्या कर्जमाफी मध्ये असल्याचे ना. थोरात यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com