राहाता तालुक्यातील 1439 व्यक्तींना होमकोरोंटाईन

राहाता तालुक्यातील 1439 व्यक्तींना होमकोरोंटाईन

32 जणांचे नमुने तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत – डॉ. गायकवाड

राहाता (तालुका प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून आलेले 32 नागरीक तसेच परप्रांत व परजिल्ह्यातून राहाता तालुक्यात आपल्या घरी अथवा नातेवाईकांकडे आलेल्या सुमारे 1439 व्यक्तींना आरोग्य विभागाने होमकोरोंटाईन केले आहे. यातील 32 जणांचे घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते.

त्या सर्वांचे तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोना व्हायरसचे संकट संपलेले नसून कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाचे आदेश सुचना आणि लॉकडाऊनचे काटेकोर व तंतोतंतपणे पालन करून कोरोना विरोधातील लढाईत नागरिकांनी प्रशासन व आरोग्यविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन राहाता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय गायकवाड यांनी केले आहे.

राहाता तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय गायकवाड म्हणाले की, कोरोना विरोधातील लढाईसाठी तालुका आरोग्य विभाग सज्ज आहे. आपल्या आरोग्यासाठी शासन निर्देशानुसार वेळीच उपाययोजना राबवून आवश्यक ती सर्व खबरदारी आरोग्य यंत्रणा घेत आहे. सर्दी घसा, खोकला, ताप असल्यास नागरिकांनी भिती न बाळगता नजिकच्या सरकारी दवाखान्यात तपासणी करावी. प्रशासनाच्या सूचना व आदेशांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी वैयक्तीक व सार्वजनिक हिताची काळजी घ्यावी.

कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग व्हावे. राहाता तालुक्यात अद्यापपर्यंत एकही कोरोना सदृश्य रुग्ण आढळळेला नाही. परदेशातून आलेल्या 32 व्यक्तींना होम क्वॉरांटाईन केले होते. त्यांचे स्त्राव नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवरा मेडिकल ट्रस्टने लोणी येथे शंभर खाटांचे रूग्णालय बनविले आहे. तर साईबाबा संस्थानने सुद्धा पर्यायी व्यवस्था करून ठेवली आहे.

कोरोनाच्या धास्तीने व भीतीने घाबरून जाण्याऐवजी प्रशासनाने दिलेल्या सूचना व काढलेल्या आदेशाचे प्रत्येक नागरिकाने वेळोवेळी काटेकोरपणे तंतोतंत पालन करावे. गरज नसताना घराबाहेर जाणे टाळावे, गर्दीत जावू नये, त्याचबरोबर वेळच्यावेळी हातांची स्वच्छता ठेवावी, पोलीस आरोग्य विभाग प्रशासन सरकार आपली खूप काळजी घेत असून राहाता तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सर्व डॉक्टर्स व आरोग्य व्यवस्थेतील इतर कर्मचारी आशा स्वयंसेविका हे सर्वजण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्या प्रयत्नांना तुम्ही सर्वांनी सूचना तसेच लॉकडाऊनच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला साथ द्यावी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय गायकवाड यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com