साईबाबांच्या आशीर्वादानेच पद्मश्री पुरस्कार – एकता कपूर
स्थानिक बातम्या

साईबाबांच्या आशीर्वादानेच पद्मश्री पुरस्कार – एकता कपूर

Sarvmat Digital

प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र व एकता कपूर यांनी घेतले साई दर्शन

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- देशातील सर्वोत्कृष्ट पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने मी खूप आनंदी झाले असून मला या सन्मानास पात्र ठरविल्याने जनतेचे आभार मानत हा पुरस्कार साईबाबांच्या आशीर्वादाने मिळाल्याचे हिंदी चित्रपट निर्माती एकता कपूर हिने सांगितले.

बुधवार दि. 29 जानेवारी 2020 रोजी दुपारी बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता जितेंद्र आणि त्यांची सुकन्या टीव्ही सिरियलची सुप्रसिद्ध निर्माती एकता कपूर यांनी साईदरबारी हजेरी लावत साईबाबा समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दर्शनानंतर एकता कपूर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, मला देशातील सर्वोत्कृष्ट पद्मश्री अवॉर्ड मिळाल्याने मी खूप आनंदी झाले असून देशातील जनतेचे आभार मानते. दरम्यान देश प्रगतिपथाकडे जात असून येणार्‍या काही दिवसांत युवा बुद्धिवर्गाच्या कलाकारांना संधी उपलब्ध करून देणार आहे.

हिंदी धारावाहिक हम पाच या माध्यमातून छोट्या पडद्यावर मी सुरुवात केली होती. प्रत्येक मनुष्याचे एक कर्तव्य आहे की जीवनात काम करीत राहणे. मला माझ्या वडिलांप्रमाणे जीवनात काम करून नावलौकिक मिळवायचा आहे. साईबाबांच्या दर्शनाने आम्हाला मनस्वी आनंद प्राप्त झाला आहे. यावेळी पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने सुपरस्टार जितेंद्र यांनी कन्या एकता कपूरचे कौतुक केले.

जितेंद्र यांनी सांगितले की, देशात काही ठिकाणी जोडण्याचे वातावरण आहे तर काही ठिकाणी तोडण्याचे काम सुरू असून साईबाबांचे स्थान जोडण्याचे आहे. यापेक्षा मोठी गोष्ट कुठेही नाही. या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माचे लोक येऊन जोडले जातात. बाबांनी सर्व धर्माचे लोक जोडून ठेवले आहे. मला जन्म जरी आईने दिला असता तरी जितेंद्रला जन्म देणारे व्ही शांताराम असल्याची त्यांनी स्पष्टोक्ती दिली.

आपल्या कन्येला पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने तिच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन करीत आमच्या परिवारावर साईबाबांच्या कृपाशीर्वाद आहे. 1973 साली पहिल्यांदा साईबाबांचे दर्शनास आलो होतो. त्यानंतर ज्या ज्या वेळेस मी शिर्डीत आलो त्यावेळी माझ्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्याचे अभिनेते जितेंद्र यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com