पोलिसांसाठी जिल्ह्यात नऊ सॅनिटायझेशन व्हॅन

jalgaon-digital
2 Min Read
उत्तर, दक्षिणसह सात उपविभागासाठी सुविधा
अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरासह जिल्ह्यात कर्तव्यावर असणार्‍या प्रत्येक पोलीस कर्मचार्‍यांवर आता सॅनिटायझरर्सची फवारणी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस दलाने मोबाईल मिस्टिंग सॅनिटायझेशन व्हॅन तयार केल्या आहेत. जिल्ह्यात एकूण नऊ व्हॅन तयार करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी दिली. कामावर असणार्‍या पोलिसांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. आतापर्यंत 26 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. लोकांनी घरात थांबावे यासाठी जिल्ह्यात सर्वत्र पोलीस दिवस रात्र काम करत आहेत. संचारबंदीची अमंलबजावणी करण्यासाठी पोलीस आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. त्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठीजिल्हा पोलिसांनी या निर्जंतुकीकरण व्हॅन तयार केल्या आहेत. दक्षिण व उत्तर विभागासाठी प्रत्येकी एक व जिल्ह्यातील सात उपविभागीय पोलीस विभागासाठी प्रत्येकी एक अशा नऊ व्हॅन असणार आहे. या व्हॅनमध्ये फवारणी पंपाचा उपयोग करून कर्मचार्‍यांवर पाच ते सात सेकंद फवारणी केली जाते.

आठ व्हॅनची तपासणी करून व्हॅन फिरतीवर सोडण्यात आल्या असून अजून एक व्हॅन लवकरच दाखल होणार असल्याची माहिती अखिलेश कुमार सिंह यांनी दिली. कर्मचार्‍यांचा कर्तव्यावर असताना विविध घटकांशी संपर्क येतो. त्यामुळे त्यांना धोका वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाकाबंदीच्या ठिकाणी ही व्हॅन जाईल व त्याठिकाणी पोलीस आपल्याला निजंर्तुक करुन घेतील. अशा प्रकारे ही व्हॅन नेमणुकीच्या ठिकाणी फिरतीवर राहणार आहे. फवारणी केल्यानंतर त्याचा परिणाम काही तासांसाठी राहतो. या व्हॅन फिरत्या राहणार असून दिवसभरात दोन वेळा कर्मचार्‍यांवर फवारणी होणार आहे.

सॅनिटायझर चेंबर
पोलीस अधीक्षक कार्यालयात निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर चेंबर तयार करण्यात आले आहे. कार्यालयात येणारे अधिकारी कर्मचारी यांच्या निर्जंतुकीकरणासाठी ही व्यवस्था करण्यात आली असून मास्क मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे अधीक्षक सिंह यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *