पिंपरी निर्मळ आणि कोल्हारच्या चार भाविकांचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू
स्थानिक बातम्या

पिंपरी निर्मळ आणि कोल्हारच्या चार भाविकांचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू

Sarvmat Digital

शिर्डी (प्रतिनिधी)-  गुजरातमधील कुबेर या देवस्थानचे दर्शन घेऊन परतत असताना ट्रक व कारच्या भीषण अपघातामध्ये पिंपरी निर्मळ येथील दोघांचा व त्यांच्या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला.

यामध्ये नंदकिशोर संपत निर्मळ (वय.28), गोरक्षनाथ एकनाथ घोरपडे (वय.63) (दोघेही रा. पिंपरी निर्मळ ता.राहाता अहमदनगर), किशोर रायभान कोल्हे (रा.नांदगाव, औरंगाबाद) प्रवीण सारंगधर शिरसाठ (रा.कोल्हार खुर्द, ता राहुरी अ.नगर) यांचा समावेश आहे. इर्टीका एमएच17.ए झेड.457 या चारचाकीतून ते चौघे देवदर्शन घेऊन परतत होते.

याबाबत त्यांच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या महितीनुसार निर्मळ पिंप्री येथील नंदकिशोर निर्मळ, गोरक्षनाथ घोरपडे, कोल्हार येथील प्रवीण शिरसाठ व नांदगाव येथील किशोर कोल्हे हे गुजरात येथे कुबेराच्या दर्शनास गेले होते. देवदर्शन आटोपून ते परत येताना गुजरात जवळ राजपीपाला घाट येथे मध्यरात्री त्यांची इर्टिका कार नं एम.एच.17 ए.झेड.457 हिची ट्रकशी (नं एम एच 18 ए.जे. 8709) जोराची धडक झाली.

यामध्ये कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. धडक एवढी जबरदस्त होती की कार मधील चारही जनांचा जागेवरच मृत्यू झाला. घटने नंतर कोल्हार खुर्द येथील फिटर संदीप सातव त्याच परिसरात होते. त्यांच्या गाडीचा नंबर एम.एच 17 पासिंग पाहून एका ट्रक चालकाने ही माहिती सातव यांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना तेथील हॉस्पिटल मध्ये दाखल केले.

मात्र चौघांचा या अपघातात मृत्यू झाला होता. राजपिपला नगरपालिकेच्या रूग्णवाहिकेत चारही मृतदेह राजपिपला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या अपघातासंदर्भात नर्मदा पोलिसांनी कारवाई केली आहे. या अपघाती निधनाने पिंपरी निर्मळ, कोल्हार ग्रामस्थांवर शोककळा कोसळली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com