पेट्रोल १५ पैसे तर डिझेल १४ पैशानी घटले
स्थानिक बातम्या

पेट्रोल १५ पैसे तर डिझेल १४ पैशानी घटले

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

इंधन दरवाढीचा चटका सोसणाऱ्या वाहनधारकांना आज दि. १६ पट्रोलच्या किमतीत १५ पैसे आणि डिझेलच्या किमतीत १४ पैसे घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग दाटून आल्याने इंधनदरवाढीचे संकट संपूर्ण देशासमोर होते. गेल्या शनिवारी दि. ११ पेट्रोल ८२.२३ रुपये आणि डिझेल ७२.०२ पैसे प्रतिलिटर झाल्याने ही दरवाढ शंभरीकडे पोहोचते की काय अशी भीती निर्माण झाली होती.

पेट्रोल-डीझेलचे दर प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल–डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी ६ वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समावेश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

त्यानुसार आज नाशिकमध्ये ८१.९२ रुपयांवर असलेल्या पेट्रोलच्या दरात १५ पैशांची घट झाली. ८१. ७७ रुपये दराने दिवसभर शहरात विक्री सुरु होती. तर डिझेलच्या किमतीत देखील १४ पैशांची घसरण झाली. ७१.९० रुपयांवरून ७१.७६ रुपये भावान डिझेल विकले गेले. गेल्या आठ दिवसांचा किमतीतील चढउताराचा आढावा घेतला तर दि. ८ जानेवारी रोजी पेट्रोल ८१.९६ रुपये तर डिझेल ७१.६१ रुपये प्रतिलिटर होते. दि. ११ जानेवारीला या दरात वाढ होत पेट्रोलची किंमत सर्वाधिक ८२.१३ रुपये तर डिझेलची किंमत ७२.०२ रुपये झाली. दि. १४ व १५ जानेवारीला पेट्रोलचा भाव ८१.९२ रुपये तर डिझेल ७१.९० रुपये या किमतीने नाशिकमध्ये विकले गेले.

Deshdoot
www.deshdoot.com