आता सर्वांना मिळणार पेट्रोल

आता सर्वांना मिळणार पेट्रोल

डिझेलची वेळ दुपारी बारापर्यंत

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रभाव रोखण्यासाठी मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यातील उपाययोजना आणखी कडक करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला होता. त्यात खासगी वाहनांना पेट्रोल बंदी केली होती. मात्र, अवघ्या एका दिवसांत जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय मागे घेतला असून शेतकरी व इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची गैरसोय त्यांनी दूर केली आहे. त्यामुळे सर्वांना पूर्वीप्रमाणेच पहाटे 5 ते सकाळी 9 या वेळेत पेट्रोल मिळणार आहे.

देशात लॉकडाऊन वाढल्याने जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी मंगळवारी सर्वच प्रतिबंधात्मक आदेशांमध्ये 30 एप्रिलपर्यंत वाढ केली. हे करत असतानाच रस्त्यावर विनाकारण होणारी गर्दी आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने त्यांनी सर्व खासगी वाहनांना पेट्रोल बंद करण्याचाही आदेश दिला. यात केवळ शासकीय वाहने, रूग्णवाहिका, वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, परिचारीका, वैद्यकीय सेवेशी निगडीत कर्मचारी यांना ओळखपत्र तपासून पेट्रोल मिळण्याची सूट देण्यात आली होती. परंतु अत्यावश्यक सेवेतीलच इतर अनेकांना यातून वगळल्याने मोठी गैरसोय झाली. बुधवारी अनेकांनी पेट्रोलपंपावर रांगा लावल्या. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला. शिवाय शेतकरी, भाजीविक्रेते, फळविक्रेते, दूधविक्रेते, वृत्तपत्रविक्रेते, सरकारी आणि खासगी बँकांचे कर्मचारी, पतसंस्थांचे कर्मचारी, पोलीस, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांना पेट्रोल मिळणार नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

याबाबत अनेकांनी थेट राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर तक्रारी करत हा निर्णय कसा अन्यायकारक असल्याचे निदर्शनास आणून दिले. ही बाब काहींनी खुद्द जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. काही ठरावीक व्यक्तींचा फटका सर्वांना बसत असल्याचे समोर येताच जिल्हाधिकार्‍यांनी बुधवारी सायंकाळी पेट्रोल बंदीचा आदेश रद्द करून तो पुन्हा पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्याची दुरूस्ती केली. त्यामुळे आता सर्वांना पेट्रोल पहाटे 5 ते सकाळी 9 या वेळेत, तर डिझेल पहाटे 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मिळणार आहे. हा आदेश आता 3 मे पर्यंत लागू राहणार आहे.

जिल्हा प्रशासनाने सोडले, पोलीसांनी अडकवले
मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी यांनी खासगी वाहनांचे पेट्रोल बंद केले. हा आदेश बुधवारी त्यांनी माघारी घेतला. मात्र, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी नव्याने आदेश काढत बँकिंग क्षेत्र, केबल टीव्ही, शासनाच्या परवानगीने सुरू असणार्‍या कंपन्या, दुध व्यवसायीक, शासकीय-निमशासकीय, सरकारी महामंडळे आणि आस्थापना, गॅस वितरण, हॉस्पीटल, रुग्णवाहीका, पेट्रोलपंप किरणा दुकान आणि फळ विक्रेत, टेलीकम्युनिकेशन, मालवाहतूक, पत्रकार आणि अन्य क्षेत्रातील व्यक्तींना घराबाहेर पडून कामावर जाण्यासाठी पोलीसांच्या परवानगीची सक्ती केली आहे. यात मृत व्यक्तीसह तातडीच्या उपचारासाठी ऑनलाईन पासची सक्ती केली आहे. यामुळे खासगी व्यक्तांना पेट्रोल न देण्याच्या निर्णयाच्या कचाट्यातून नागरिक सुटले असले तरी पोलीसांच्या ऑनलाईन पासच्या फेर्‍यात नागरिक अडकणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com