इतना सन्नाटा क्यू है भाई…!

jalgaon-digital
9 Min Read

सर्वत्र शुकशूकाट, पहिल्यांदाच रस्ते निर्मनुष्य, प्रशासनाची परिस्थितीवर नजर

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला, तसेच जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला नगर शहरवासियांनी उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद दिला. अर्थात, एका दिवसातही लढाई अजून संपलेली नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका संपेपर्यंत अनावश्यक घराबाहेर पडू नका. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.

दरम्यान, रविवारी सकाळपासून नगर शहरातील मोठ्या मोठा आणि छोट्यातील-छोटा निर्मनुष्य दिसला. या नगर शहरात ‘इतना सन्नाटा क्यू है भाई’ या शोले चित्रपटातील डायलॉगची आठवण आल्याशिवार राहत नव्हती.
कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज (रविवारी) जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरवासी यांनी प्रतिसाद दिला. शहराला जोडणार्‍या पुणे, सोलापूर, मनमाड, औरंगाबाद, पाथर्डी, जामखेड या प्रमुख रस्त्यांसह शहरातील महत्वाचे रस्ते दिवसभर रिकामे होते.

ज्या नगर शहरात मराठी क्रांती मोर्चात लाखोंच्या संख्याने नागरिक सहभागी झाले होते. त्याच शहरातील रस्ते माणसांअभावी कमालीचे भासत होते. शहरातील मुख्य बाजार पेठ, शहराच्या मध्यभागामतून जाणारे राज्य मार्ग या ठिकाणी ड्रोन कॅमेर्‍यांने घेतलेल्या छायाचित्रात हा परिसर नगर शहरातील आहे, यावर विश्वासच बसत नव्हता

यासह शहरातील उपनगरात वेगळी परिस्थिती नव्हती. सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त होता. असे असतांना नगरकरांनी दिवसभर घरात राहणे पसंत केले. रस्त्यावर एखादा अपवाद वगळता दोन-ते तिन तासाने एखादा व्यक्ती दिसत होता. तो देखील औषधांसह अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडलेला दिसत होता. नगरच्या रेल्वे स्थानकासह तीनही एसटी महामंडळाची बसस्थानकांवर शुकशूकाट होता. यासह नगरच्या रेल्वे स्टेशनची परिस्थिती वेगळी नव्हती.

भिक्षूक, वेड्यांचे हाल
कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी नगर शहरात रविवारी बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये शहरातील विभागातील भिक्षूक आणि वेड्याचे जेवणाचे हाल झाले. मात्र, काही कर्तव्या दक्ष पोलीस कर्मचारी, नालेगावातील नवग्रह मंडळाचे कार्यकर्ते यांनी या लोकांसह पोलीस बंदोबस्तावर असणारे पोलीस कर्मचारी, मनपा कर्मचारी, पुणे, माळीवाडा, तारकपूर बसस्थानकात अडकून पडलेल्या व्यक्तींसाठी पिण्याचे पाणी आणि कांदा पोहले स्वत: फिरून वाटप करत मानूसकीचे दर्शन घडवले.

जिल्हाधिकारी आजही रस्त्यावर
पंतप्रधान मोदी यांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर रविवारी पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी पुन्हा नगरच्या रस्त्यावर उतरले. मात्र, दोन-तीन दिवसांप्रमाणे काल परिस्सिथती दिसली नाही. शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 144 कलम लागू केले असून यासह नगर शहरात आणखी काय उपाययोजना करता येवू शकते, याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी ‘सार्वमत’शी बोलतांना सांगितले.

शहराचा मध्यवर्ती भागात शुकशूकाट

कापड बाजार, माळीवाडा वेस, चितळेरोड ओस

अहमदनगर (प्रतिनिधी)– जनता कर्फ्युला पाठिंबा देण्यासाठी मध्यवर्ती शहरांमध्ये रविवारी सकाळपासूनच सर्व भागातील रस्ते निर्मनुष्य होते. रस्त्यांवर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी दिसत होते. सकाळी तुरळक लोक फिरण्यास बाहेर पडले असले तरी आठनंतर शहर पूर्णपणे निर्मनुष्य झाले होते. तीन दिवसांपूर्वी अत्यावश्यक सेवेतील वगळता सर्व दुकाने, अस्थापने बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. तर रविवारी जनतेने घराबाहेर पडू नये यासाठी दोन दिवसापासून जनजागृती करण्यात येत होती.

यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील महत्वाचे चौक, बाजारपेठा अक्षरश: ओस पडल्याचे चित्र होते. कापड बाजार, चितळे रोड, दिल्ली गेट असे गर्दीने गजबजलेली ठिकाणी दिवसभर शुकशुकाट होता. कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येकजण जणू वचनबद्ध असल्याची ग्वाही या कृतीतून नगरकरांनी दाखवून दिली. शहरातील माळीवाडा, पुणे बसस्थानकांवर प्रवाशांची अजिबातच ये-जा नव्हती. संपूर्ण रस्त्यावर ये-जा दिसत होती ती अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या अधिकारी आणि कर्मचारी यांची.

रविवारी जनता कर्फ्यु असल्याने नगर शहराचे प्रवेशद्वार व विविध विभागाचे कार्यालय असलेला माळीवाडा परिसर सकाळपासून निर्मनुष्य होता. माळीवाडा परिसरात पुणे बसस्थानक, माळीवाडा बसस्थानक, जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बँक आदी विभागाचे कार्यालय आहे. याभागात पुणे, मुंबई, औरंगाबाद, बीड या जिल्हाबरोबरच नगर जिल्ह्यामधील इतर भागाकडे जाण्या-येण्यासाठी नागरिकांची नेहमीच गर्दी असते. तसेच, जिल्हा परिषद, जिल्हा बँकेमध्ये कामानिमित्त ग्रामीण भागातून येणार्‍या लोकांची वरदळ असते.

रविवारी जनता कर्फ्युला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाल्याने माळीवाडा परिसर ओस पडले होते. परिसरात मोठा बंदोबस्त तैनात होता. घराबाहेर पडलेल्या लोकांना पोलिसांकडून विचारणा केली जात होती. काम नसेल तर, घरी जाण्याचा आदेश पोलीस लोकांना देत होते. कापड बाजारामध्ये नेहमीच सकाळी सातपासून रात्री बारा वाजपर्यंत गर्दी असते. जिल्हभरातूून नागरिक कापडे खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असतात परंतू, कर्फ्युमुळे कापड बाजार पहिल्यां निर्मनुष्य होता.

इलेक्ट्रालिक वस्तू, वाहनांचे स्पार्ट आदी बाबीसाठी सर्जेपुरात लोकांची नेहमीच गर्दी असते रविवारी लोकांनी खरेदीसाठी बाहेरअ न पडल्याने सर्जेपुरात शुकशुकाट होता. खाद्य पदार्थांसाठी, खरेदीसाठी नेहमीच लोकांची गर्दी असलेल्या दिल्लीगेट परिसर रविवारी निर्मनुष्य होता. नव्यानेच विकसित झालेला व शिक्षणासाठी, खाजगी शिकवणीसाठी ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची वरदळ असलेला बालिकाश्रम रोड परिसरात कोरोनामुळे शुकशुकाट होता. रविवारी जनता कर्फ्यु असल्याने व सर्व दुकाने, अस्थापने बंद असल्याने दोन दिवसापूर्वी विद्यार्थ्यांनी आपआपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे बालिकाश्रम परिसरात शुकशुकाट होता. रामवाडी, नालेगाव, रामवाडी आदी परिसरात जनाता कर्फ्युला नगरकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.

पहिल्यांदाच नगर शहरात सन्नाटा असल्याने काही लोकांना याबाबत उत्सुकता होती. यामुळे आधुनमधुन काही नागरिक रस्तावर येऊन बाहेर काय परिस्थिती आहे, याची पाहणी करत होते. परंतू, गस्तीवर असलेल्या पोलिसांकडून लोकांना घरात राहण्याच्या सुचना करण्यात येत होत्या. काही लोक घराच्या बालकणीतून, खिडक्यातून बाहेर काय परिस्थिती आहे याची पाहणी करत होते. रोडवर पोलीसांचे वाहन, रूग्णवाहिका दिसून येत होती. दिवसभर सन्नाटा होता.

एमआयडीसी, पाईपलाईन, सावेडी भागात जनतेचे स्वयंस्फूर्त ‘लॉकडाऊन’

पोलीसांची अर्ध्या तासाला गस्त : मालवाहू वाहनांची नगण्य वर्दळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- जनता कर्फ्युला पाठिंबा देण्यासाठी नगर शहराजवळ असणार्‍या एमआयडीसी, उपनगर असणार्‍या सावेडी, पाईपलाईन, बोल्हेगाव फाटा, गजानन कॉलेनी या भागातील जनतेने प्रशासनाच्या आवाहानाला प्रतिसाद देत स्वत: हून लॉकडाऊन ठेवत कडकडीत बंद ठेवला. हा सर्व भाग हा नगर शहरापासून वेगळा असून ग्रामीण भागातून नोकरी, कामधंदे, एमआयडीसी कामगार, सुशिक्षित वर्ग या भागात राहत असून मध्यवर्ती शहरापेक्षा हा भाग पूर्ण वेगळा आहे. मात्र, या ठिकाणी देखील ‘इतना सन्नाटा क्यू है भाई’ अशीच परिस्थिती होती.

नगर शहराजवळ असणार्‍या एमआयडीसी भाग हा कामगार, परप्रांतीय कामगार, कंपनी कामगार म्हणून ओळखला जातो. कंपन्या, कामगार यावरच या भागातील छोटे व्यवसाय अवलंबून असतात. या ठिकाणी स्वतंत्र मोठा भाजी बाजार, कपड्यापासून ते औषधे आणि डॉक्टरपासून ते हॉस्पिटल आहेत. मात्र, जनता कर्फ्यूमध्ये या ठिकाणी रविवारी दिवसभर भयान शांतता होती. नेहमी गर्दी, माणसांनी गजबलेला हाच तो भाग आहे का यावर विश्वास बसत नव्हता. या ठिकाणी सावेडी नाका ते विळद घाटातील विखे पाटील हॉस्पिटपलपर्यंत ऐरवी जीव मुठीत धरून वाहने चालविण्याची वेळ असतांना रविवारी नगर-मनमाड रोडवर दुर्तफा रस्त्याच्या मधोम अर्धा तास उभे राहिले, तरी वाहने येत नव्हती. यावरून नगर-मनमाड राज्य मार्गाची काय अवस्था असले याची जाणीव झाल्याशिवाय राहत नव्हती.

मात्र, असे असतांना एमआयडीसीमध्ये रोजंदारीवर काम करणार्‍या कामगारांची रोजगारासोबतच खाण्यापिण्याचे हाल झाले होते. एमआयडीसीला खेटून असणार्‍या बोल्हेगाव फाटा, बोल्हेगाव, गांधी नगर, नागापूर, नवनागापूर या भागात दाट लोकवस्ती असून या ठिकाणी देखील नागरिक रविवारी दिवसभर घरात होते. या भागातील भाजी विक्रेते, अन्य साहित्य आणि किरणामालाची विक्री करणारे दुकाने शंभर टक्के बंद होती. जनता कर्फ्यू आणि कोरोनचा प्रार्दभाव याचे महत्व या लोकांना पटल्याने त्यांनी जिल्हा प्रशासननाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

यामुळे हा सर्व परिसर शंभर टक्के बंद होता. शहराचे प्रमुख उपनगर म्हणून ओळख असणार्‍या पाईप लाईन रोडचा पसारा वाढलेला आहे. शहराप्रमाणे नव्याने या भागात नागरी वस्ती वाढत आहे. या ठिकाणी स्वतंत्र बाजार पेठ तयार झालेली असून या भागाच्या नियंत्रणासाठी ऐरवी पोलीसांना कसरत करावी लागत असतांना रविवारी या भागात भिषण शांतता होती. सावेडीपासून सुरू होणार्‍या या भागात डॉक्टर वकील, नोकरदार, व्यवसायीक, व्यापारी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांचे निवास याच भागात आहे.

पाईपलाईन रोड, प्रोफेसर कॉलेनी, गुलमोहर रोड, भिस्तबाग नाका, वैदूवाडी, सोना नगर, एकवीरा चौक, श्रीराम चौक, निर्मल नगर, लेखा नगर, ढवण वस्ती यासह मोठ-मोठ्या वस्त्यांमध्ये हा भाग विखूरलेला आहे. मात्र, रविवारी या भागात कामाची शांतता होती. नागरिक घरात तो पोलीस रस्त्यावर होते. या भागात सर्वच प्रकारची असणारे दुकाने बंद होती. भिस्तभाग नाक्यावर लोकसेवा यासाठी एक औषधाचे दुकान सुरू होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *