Thursday, May 2, 2024
Homeनगरदोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू

अकोले (प्रतिनिधी) – शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलींचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील पाडाळणे येथे काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत त्यांच्या सोबत असणारी तिसरी मुलगी बचावली असून तिच्यावर अकोले येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुवर्णा रामदास शेंगाळ (वय 13) व कोमल भिका अस्वले (वय 14) (दोघीही रा.पाडाळणे) या या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत. तर शुभांगी रामदास शेंगाळ (वय 16) हिच्यावर उपचार सुरू आहेत.
पाडाळणे येथील शेंगाळ कुटुंब हे मोलमजुरी करते.

त्यांच्याकडे तीन ते चार शेळ्या आहेत. दररोज शेंगाळ दांम्पत्य शेळ्या चारतात. पण काल त्यांच्या मुली शेळ्या चारण्यासाठी चिंचावणे -पाडाळणे या गावांच्या हद्दीवर असलेल्या पाडाळणेच्या आदिवासी कॉलनी जवळील पाझर तलाव परिसरात गेल्या होत्या. दुपारी 3 ते 4 वाजेच्या सुमारास या मुली पाझर तलावाजवळ गेल्या होत्या. यावेळी सुवर्णा शेंगाळ व कोमल अस्वले या दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेत शुभांगी शेंगाळ ही जखमी झाली आहे. पाझर तलावात दहा -बारा फूट पाणी होते. तेथेच जवळ असलेल्या चिंचावणे येथील एकाने यातील शुभांगी शेंगाळ हिला पाण्यावर गटांगळ्या खाताना पाहिले. तो इसम पाझर तलावाजवळ गेला व त्याने बुडत असलेल्या मुलीस बाहेर काढले.

- Advertisement -

तिने दोघी बुडाल्याचे सांगितल्यावर स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांचा शोध घेऊन दोघींचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ही बातमी वार्‍यासारखी पाडाळणे व परिसरात पसरली. घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.  सुवर्णा शेंगाळ व कोमल असवले या दोघींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाझर तलावात खालील बाजूस अधिक प्रमाणात गाळ असल्याने या दोघी खाली गाळात गेल्या असल्याचा अंदाज आहे. तर सुवर्णा हिची मोठी बहीण शुभांगी शेंगाळ या बुडत असणार्‍या मुलीस बाहेर काढले. जखमी अवस्थेत तिला अकोले येथील डॉ. भांडकोळी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सावंत यांनी सांगितले. दरम्यान अकोले ग्रामीण रुग्णालयात मयत मुलींना शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.

दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी रोशन पंडित, पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, हवालदार बी. एन. टोपले व वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टरला नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या