नेवाशाच्या मशिदीत आढळले 10 परदेशी नागरिक

नेवाशाच्या मशिदीत आढळले 10 परदेशी नागरिक

दोघा विश्वस्तांवर गुन्हा दाखल

नेवासा (शहर प्रतिनिधी)- नेवासा शहरातील मशिदीमध्ये बाहेरच्या चार देशांतील 10 जण वास्तव्यास असल्याचे आढळून आले असून नेवासा पोलिसांनी त्यांना आश्रय
देणार्‍या मशिदीच्या दोघा विश्वस्तांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय साथरोग अधिनियम, कोरोना प्रतिबंधात्मक नियम आदी अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रतापसिंह भगवान दहिफळे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 30 मार्च रोजी नेवासा येथे पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, नेवासा येथील मरकस मशिदीमध्ये बाहेरच्या देशातील लोक वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांच्या आदेशाने भालदार मशिद (मरकस मशिद) येथे छापा टाकला असता तिथे या मशिदीचे विश्वस्त (ट्रस्टी) जुम्माखान नवाबखान पठाण व सलिम बाबुलाल पठाण रा. नेवासा खुर्द यांचेसह जिबुती देशातील 5, बेनिन देशातील एक, डेकॉर्ट देशातील तिघे व घाना देशातील एक व्यक्ती असे 10 जण आढळून आले.

मशिदीचे विश्वस्त जुम्माखान नवाबखान पठाण व सलिम बाबुलाल पठाण यांना कोविड 19 रोगाचा फैलाव होईल हे माहिती असताना तसेच जिल्हाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन होईल हे माहिती असतानाही बाहेरील देशातील 10 जणांना मशिदीत राहण्यासाठी प्रवेश दिल्याने वरील दोघा विश्वस्तांवर भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270, 290 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) (3) प्रमाणे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच महाराष्ट्र कोरोना कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चा नियम 11 व भारतीय साथ रोग अधिनियम 1897 चे कलम 2, 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com