नेवासा : कारेगाव येथे मुंबईहून आलेला तरुण पॉझिटिव्ह
स्थानिक बातम्या

नेवासा : कारेगाव येथे मुंबईहून आलेला तरुण पॉझिटिव्ह

Sarvmat Digital

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- मुंबई-भांडुप येथून नेवासा तालुक्यातील कारेगाव येथील आपल्या गावी आलेल्या एकतीस वर्षीय तरुणाला शुक्रवारी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेऊन क्वारंटाईन केले असता शनिवार 30 मे रोजी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.

याबाबत माहिती देतांना डॉ.अभिराज सूर्यवंशी म्हणाले की, नेवासा तालुक्यातील कारेगाव येथील एकतीस वर्षीय युवक हा मुंबई येथे नोकरीस होता. तो गावी आल्याची खबर नागरिकांनी तहसीलदार रुपेश सुराणा व तालुका आरोग्य अधिकारी यांनी कळविली. त्यानंतर कारेगाव येथे जाऊन सदरच्या युवकास ताब्यात घेऊन श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात त्याला शुक्रवार दि.29 मे रोजी क्वारंटाईन करण्यात आले होते.

त्याच रात्री या युवकास ताप व इतर लक्षणे दिसून आल्यानंतर त्याला नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्याचा स्राव तपासण्यात आला असता शनिवार काल दि.30 मे रोजी सायंकाळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी सांगितले.

गेल्या दोन ते सव्वा दोन महिन्यापासून नेवासा तालुका करोनामुक्त झाला असतांना मागील आठवड्यातच नेवासा बुद्रुक येथे कल्याणहुन महिला भेटायला आली ती करोना पॉझिटिव्ह निघाली. तिच्या नंतर तिच्या नातवाचा रिपोर्ट ही पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे पुढील खबरदारी घेण्याच्या द़ृष्टीने बाहेरील व्यक्ती आली असल्यास त्याने स्व:तहुन क्वारंटाइन व्हावे माहिती लपवून ठेवू नये असे आवाहन तहसीलदार रुपेश सुराणा व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी नेवासा तालुक्यातील जनतेला केले होते. मात्र सदरचा युवक हा मुंबईहुन येथे आल्यानंतर तो क्वारंटाईन झाला नाही.पण गावातील लोकांच्या जागरुकतेमुळे त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते.

नेवासा तालुका सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने नागरिकांनी जागरूक राहून स्व:तची काळजी घ्यावी त्यास बरोबर बाहेरील व्यक्ती गावात आली असल्यास प्रशासकीय यंत्रणेला त्याची माहिती द्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने तहसीलदार रुपेश सुराणा व डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी जनतेला केले आहे. यातील ह्या तरुणांच्या कुटुंबातील पाच व्यक्ती व मुबंई येथून सोबत आलेले आठ व्यक्तींना भानहिवरा येथील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com