नाशिकचा पारा १४ अंशावर; मराठवाड्यातही हुडहुडी
स्थानिक बातम्या

नाशिकचा पारा १४ अंशावर; मराठवाड्यातही हुडहुडी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । उत्तर भारतात नोव्हेंबर महिन्यानंतर आता पुन्हा एकदा बर्फवृष्टी सुरू झाली आहे. यामुळे याभागातील संपर्क तुटला जाऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. जम्मू – काश्मिर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड भागात सतत बर्फवृष्टी सुरू झाल्याने याचा परिणाम शेजारी राज्यांत दिसू लागला आहे. या बदललेल्या वातावरणामुळे काही भागात तुरळक पाऊस पडू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत कमी झाले असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. आज उस्मानाबाद याठिकाणी सर्वात निच्चांकी 13.8 अंश सेल्सीअस किमान तापमानाची नोंद झाली असून त्याखालोखाल नाशिकला 14 अंश तापमानाची नोंद झाली असल्याने गारठा वाढला आहे.

मागील आठवड्यात राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पारा 11 ते 14 अंशापर्यंत गेल्याने हुडहुडी भरली होती. यावेळी नाशिक जिल्ह्यात पारा 20 अंशावरुन 13 अंशावर गेला होता. आता पुन्हा हेच गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात दिसून येत आहे. आज उत्तर महाराष्ट्रात पारा 14 ते 16 अंशावर नोंदवला गेला आहे.

मराठवाड्यात पारा घसरला असून राज्यात नीच्चांकी किमान उस्मानाबाद येथे नोंदवले गेले. तर आज नाशिक 14, पुणे 15, मालेगाव 15.5, जळगाव 15.6, महाबळेश्वर 14.4, औरंगाबाद 16.3, परभणी 17.8, नांदेड 16, अकोला 17.3, अमरावती 18.4, नागपूर 16.8, गोंदिया 17.5, वासिम 15, वर्धा 18.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

देशात अलीकडे पूर्व किनारपट्टी व पश्चिम किनारपट्टीवर झालेली दोन मोठी चक्रीवादळांनी या भागाला मोठा फटका बसला. यानंतर पुन्हा पश्चिम किनारपट्टीवर दोन चक्रीवादळे आल्यानंतर चार दिवसांपूर्वी मुंबईसह कोकणपट्टीत बेमोसमी पाऊस झाला होता. या घटनांमुळे नोव्हेंबरमध्ये येणारी थंडी लांबली होती. त्यानंतर आता पुन्हा उत्तर भारतात जम्मू- काश्मिरसह शेजारील राज्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले झाले आहे.

या हवामान बदलामुळे आता थंडी जाणवू लागली असून मागील आठवड्यात पारा 13 अंशापर्यंत गेल्यानंतर पुन्हा हेच चित्र राज्यात आहे. यात उत्तर महाराष्ट्रातील पारा 12 पर्यंत जाऊन आज पुन्हा 14 ते 15 पर्यंत आला असला तरी थंडीत वाढ झाली आहे. पहाटे पडणार्‍या धुक्यात वाढ झाल्याने झाडे – पिकांवर दवबिंदू दिसू लागले आहे. येणार्‍या दोन, तीन दिवस हेच वातावरण राहणार असून नंतर पुन्हा किमान तापमान 16 अंशापर्यंत जाणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com