ऑडी कारच्या जबर धडकेत युवक जागीच ठार
स्थानिक बातम्या

ऑडी कारच्या जबर धडकेत युवक जागीच ठार

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक :

सिग्नलवर पिवळा दिवा लागल्याकडे दुर्लक्ष करीत पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऑडी चालकाने दुचाकीस्वाराला पाठीमागून जबर धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची घटना रविवारी (दि.२३) दुपारी १ वाजेच्या सुमारास एबीबी सर्कल येथे झाली. दिनकर पोपटरावर खैरणार (३२, रा. गोवर्धनगाव, गंगापूररोड) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी खैरणार सातपूरकडून नाशिकच्या दिशेने आपल्या दुचाकीवर (एम.एच १५, डी.व्ही ९४७३) निघाले. एबीबी सर्कल येथे खैरणार पोहचले त्यावेळी सिग्नलची वेळ संपत आली होती.

मात्र, थोडा वेळ हाती असल्याने त्यांनी दुचाकी पुढे नेली. याचवेळी त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ऑडीकार चालकाने (एम.एच ४१ ए.पी ९९०९) सिग्नलकडे दुर्लक्ष करीत आपले वाहन पुढे नेले. वेग आवरता न आल्याने कारने खैरणार यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे रस्त्यावर पडलेल्या खैरणार यांच्या डोक्यास वर्मी घाव बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ऑडी कार चालकाने खैरणार यांना आपल्याच कारमधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहचवले. मात्र, यानंतर कार चालक निघून गेला. दाखल करण्यात आलेल्या खैरणार यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खैरणार यांच्या दुचाकीसह चालक सोडून गेलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबत बोलताना पोलिस सूत्रांनी सांगितले की, कार जप्त झाली असून, चालक हाती लागलेला नाही. या प्रकरणी सांयकाळ पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. दरम्यान, ऑडी कारचा मालक हा एका आमदाराचा जावई असल्याचे समजते.

Deshdoot
www.deshdoot.com