सिन्नरचा नाशिकस्थीत तरुण करोना बाधीत; खासगी डॉक्टर, नर्ससह सहा संशयितांचे घेतले स्वॅब

सिन्नरचा नाशिकस्थीत तरुण करोना बाधीत; खासगी डॉक्टर, नर्ससह सहा संशयितांचे घेतले स्वॅब

सिन्नर : करोना मुक्त झालेल्या सिन्नर शहरातील नाशिकस्थीत ३० वर्षीय युवकाचा कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. हा रुग्ण गेल्या आठवड्यात सिन्नरच्या एका वस्तीत येऊन गेल्याने त्याच्या कुटुंबातील चौघांसह शहरातील खासगी डॉक्टर आणि नर्स यांना उपचारासाठी सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नाशिकच्या फुलेनगर भागात वास्तव्यास असलेला हा युवक मूळचा सिन्नरच्या जोशीवाडीतील असून गेल्या आठवड्यात तो सिन्नरला आला होता. या रुग्णास त्रास जाणवल्याने उपचारासाठी तो सिन्नर शहरातील एका डॉक्टरांकडे गेला होता. दोन दिवसांपूर्वी सदर रुग्णाचा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे.

हा रुग्ण नाशिक येथे वास्तव्यास असल्याने तिथेच कंटेन्मेंट झोन होणार असला तरी रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील त्याच्या कुटुंबातील चौघे, एक डाॅक्टर आणि नर्स अशा सहा संशयितांना हायरिस्क कान्टॅक्ट म्हणून सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती अधीक्षीका डाॅ. निर्मला गायकवाड यांनी दिली. त्यामुळे काहीशा बिनदास्त वावरणाऱ्या सिन्नरकरांची चिंता वाढली असून त्यांचे लक्ष या सहा रुग्णांच्या अहवालाकडे लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com