महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक; तिघांना सक्तमजुरी
स्थानिक बातम्या

महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक; तिघांना सक्तमजुरी

Gokul Pawar

नाशिक । महानगरपालिकेचे आयुक्त आपले ‘मित्र’ असल्याचे सांगत, नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणार्‍या तिघांना जिल्हा न्यायालयाने तिघा आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 10 हजार रुपयांची शिक्षा सुनावली.

अजिम गुलाम शेख (रा. किस्मत रो-हाऊस, पखालरोड), जहीर बनेमिया शेख (रा. चिस्तीया कॉलनी, वडाळारोड), राहुल कैलास सहाणे (रा. रेडक्रॉस हॉस्पिटलमागे,नाशिक) अशी शिक्षा झालेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. मजहर इस्माईल शेख (रा. वडाळारोड) यांच्या फिर्यादीनुसार, तिघा आरोपींनी संगनमताने मजहर शेख यांना फोन करून, महापालिकेचे आयुक्त मित्र असून तुमच्या मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले.

त्यासाठी आरोपींनी जून 2016 ते जुलै 2017 यादरम्यान शेख यांच्याकडून 5 लाख 87 हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पैशांची मागणी केली असता आरोपींनी ठार मारण्याची धमकी देत पैसे देण्यास नकार दिला होता.याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करून, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांकडे दोषारोपपत्र सादर केले होते.

हा खटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जी. के. आर. टंडन यांच्यासमोर चालला. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. सी. एस. पगारे यांनी कामकाज पाहिले. तीनही आरोपींविरोधात पुरावे सिद्ध झाल्याने न्या. टंडन यांनी तिघांना तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक महेश मोरे, महिला पोलीस व्ही. एम. सोनवणे यांनी कामकाज पाहिले.

Deshdoot
www.deshdoot.com