गंगापूर रोड :  पैज लावणं पडलं महागात; शॉक लागून तरूणाचा मृत्यू
स्थानिक बातम्या

गंगापूर रोड : पैज लावणं पडलं महागात; शॉक लागून तरूणाचा मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । मजेमध्ये पैंज लावून इलेक्ट्रिक वायरला गजाने मारण्याचा खेळ एका युवकाच्या जिवावर बेतल्याचा प्रकार संत कबीरनगर परिसरात घडला. या घटनेत शॉक लागून गंभीर भाजल्याने एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहिल अशोक खरे (17, रा. संत कबीरनगर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. उपचारादरम्यान रविवारी जिल्हा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
साहिलच्या मृत्यू प्रकरणी कालिदास वाघमारे व अमोल ऊर्फ बाळू कंकाळ या दोघांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत कबीरनगर येथील समाजमंदिराजवळील मंगल कंकाळ यांच्या घराच्या गच्चीवर मंगळवारी हा प्रकार घडला.

साहिल खरे याच्यासह कालिदास वाघमारे व अमोल ऊर्फ बाळू कंकाळ (दोघे रा. संत कबीरनगर) हे तिघे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या गच्चीवर बसलेले होेते. त्यावेळी नेम धरून गजाने इलेक्ट्रिक वायरला कोण मारतो अशी पैंज लागली. त्यात दोघा संशयितांपैकी एकाने गजाने इलेक्ट्रिक वायरला मारले. वायरला गज लागल्याने स्पार्किंग झाल्याने त्यातून उडालेला जाळ साहिलच्या अंगावर पडला.

त्यात साहिल गंभीर भाजला. त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणी साहिलच्या मृत्यू प्रकरणी कालिदास व अमोलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com