गिरणारे : कश्यपी धरणात बुडून युवकाचा मृत्यू

गिरणारे : कश्यपी धरणात बुडून युवकाचा मृत्यू

नाशिक । धरणात सोडलेल्या मासे पकडण्याचे जाळे शोधण्यासाठी ट्युबच्या सहाय्याने धरणाच्या पाण्यात उतरलेला गिरणारे जवळील गाळोशी येथील युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कश्यपी धरणात घडली.

गणपत मुरलीधर बेंडकोळी (35, रा. इंदिरानगर, गाळोशी, ता. नाशिक) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो या धरणात मच्छी उत्पादन घेणार्‍या ठेकेदाराकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कश्यपी धरणाच्या उत्तरेस असलेल्या गाळोशी (इंदिरानगर) गावातील इंदिरानगर पाड्यावरील मासेमारी व्यवसायातील वॉचमन म्हणून कार्यरत गणपत मुरलीधर बेंडकोळी हा शनिवार (दि.8) रात्री आठ वाजता गावालगतच्या कश्यपी धरणात बुडाला असल्याची माहिती त्याचा सहकारी उत्तम बेंडकोळी याने ग्रामस्थांना दिली. ग्रातास्थांनी तातडीने धरणावर धाव घेत अंधार असतानाही त्याचा शोध घेतला मात्र त्याचा काही मागमूस लागला नाही.

गावकर्‍यांनी याची माहिती हरसूल पोलिसांना दिली तसेच रविवारी चांदोरी सायखेडा येथील आपत्ती व्यवस्थापन शोधपथकाने बोटीद्वारे बुडालेल्या युवकाचा मृतदेहाचा शोध घेतला मात्र शर्थीचे प्रयत्न करूनही त्याचा मृतदेह तिसर्‍या दिवशीही हाती लागला नाही.

दरम्यान नाशिकचे तहसीलदार अनिल दौंड यांनी घटनास्थळाला भेट दिली. मृत गणपत बेंडकोळी या युवकाच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घरातील एकमेव करता व्यक्ती गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com