महिला दिन विशेष : मुलीला सशक्त अभिनेत्री घडवणारी आई ‘शुभा पाटील’

jalgaon-digital
2 Min Read

नाशिकरोड । संजय लोळगे
पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्यातील कलागुण अचूकपणे ओळखण्याची नजर पालकांकडे असल्यास ते निश्चितपणे यशोशिखरावर पोहोचून आपला ठसा उमटवतात. अंजली पाटील या गुणी अभिनेत्रीच्या आईकडे बघून याची प्रचिती येते.

मराठी, हिंदी, तेलगू, तमिळ व मल्याळम अशा विविध भाषांतील 25 हून अधिक चित्रपटांसह नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मन फकिरा’ या मराठी चित्रपटातून अमिट ठसा उमटवणार्‍या अंजलीने आपल्या अभिनय सामर्थ्याने नव्या पिढीतील आश्वासक चेहरा म्हणून संपूर्ण चित्रपटसृष्टीला दखल घ्यायला लावली आहे. सांस्कृतिकदृष्ट्या उपेक्षित असणार्‍या नाशिकरोड शहरातील जेलरोडसारख्या संवेदनशील भागात राहून तिने घेतलेली भरारी अचंबित करणारी आहे.

शुभा संजय पाटील असे अंजलीच्या आईचे नाव. सर्वसामान्य कुटुंबातील कर्तव्यदक्ष गृहिणी म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. मुळात त्यांनाही बालपणापासून नाटक, अभिनयाची आवड होती. लग्नापूर्वी शुभाताई राष्ट्र सेवा दलात असल्याने त्यांच्यावर साने गुरुजींच्या विचारांचा पगडा आहे. साधी राहणी व उच्च विचारसरणी यावर गाढ श्रद्धा असलेल्या शुभाताईंनी अंजलीला स्वच्छंद व मोकळ्या आकाशात भरारी घेण्यासाठी पूर्णपणे मुभा दिली. पतीचा विरोध असूनही मुलीच्या कलागुणांना वाव देताना त्यांनी संस्काराची बिजे रोवली. चित्रपटसृष्टीसारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने करिअर करावे, हे आजही समाजात नाकारले जाते. क्षमता व कुवत असूनही मराठी मुलींना चित्रपटसृष्टीत धाडण्यासाठी पालक तयार नसतात. तथापि शुभाताई याला अपवाद ठरल्या.

समानतेची शिकवण देणार्‍या आंबेडकरी चळवळीने देशाला दिलेली आणखी एक देणगी म्हणजे स्त्रीवाद. अंजलीने चित्रपटसृष्टीत या स्त्रीवादाची कृतिशील पायाभरणी केली ती केवळ तिच्या आईच्या भक्कम पाठबळावरच! स्व. स्मिता पाटीलसारख्या चतुरस्त्र अभिनेत्रीच्या परंपरेतील एक आश्वासक चेहरा म्हणून अंजलीकडे बघितले जाते ते केवळ तिच्या आई अर्थात शुभाताईंच्या धीरोदात्त व कणखर बाळकडूमुळेच!

अंजलीच्या अभिनयातून दिसणारा आत्मविश्वास हा तिच्या आईच्या संस्काराची पोच पावती आहे. मुलीला सशक्त अभिनेत्री म्हणून घडवणार्‍या शुभाताईंची दखल आज जागतिक महिला दिनानिमित्त घेऊन त्यांच्यातील ‘आई’ला सलाम!

सर्वजण जे करतात तेच आपल्या मुलीने केले तर बदल घडणार कसा? नवनिर्माण होणार कसे? यापेक्षा परंपरेला छेद देऊन नवविचाराने मुलांवर कृतिशील सुसंस्कार केले तरच समाजापुढे आदर्श निर्माण होईल.
-शुभा पाटील

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *