महिला वनसंरक्षक देणार ‘मिरची’चा झटका; जाणून घ्या कारण

महिला वनसंरक्षक देणार ‘मिरची’चा झटका; जाणून घ्या कारण

नाशिक ।  दुर्गम भागात, जंगलात गस्त घालताना महिला वनरक्षकांच्या स्वसंरक्षणासाठी नाशिक पश्चिम वनविभागाने 100 मिरची पावडरचे (कॅप्सी) स्प्रे विकत घेतले आहेत. या निर्णयामुळे दुर्गम भागातील महिला वनरक्षकांची गस्त सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना होत असतानाच महिला वनरक्षकांच्या रक्षणासाठी वनविभागातर्फे प्रभावी पाऊल उचलण्यात आले आहे. हैदराबाद येथील बलात्काराच्या घटनेनंतर पश्चिम वनविभागाने महिला वनरक्षकांना कॅप्सी स्प्रे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

महिला वनरक्षकांना देण्यात आलेला स्प्रे 12 फूट अंतरावरून फवारतो येतो. यामुळे छेडछेडा करण्याचा प्रयत्न करणार्‍यास दुरून रोखता येणे शक्य आहे. या स्प्रेमधून समोरच्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर मिरचीची पूड उडते. यामुळे चेहर्‍यावर अर्धा तास जळजळ होते. या वेदनेमुळे काही वेळ व्यक्तीला समोरचे दिसत नाही. परंतु सदर व्यक्तीला कोणतीही गंभीर दुखापत होत नाही. अर्ध्या तासानंतर संबंधित व्यक्ती पूर्ववत होते. यामुळे हा स्प्रे महिला वनरक्षकांचे संरक्षण करण्यास सक्षम असल्याचे बोलले जात आहे.

वनरक्षकांची गस्त प्रामुख्याने जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी भागात आणि राखीव वनक्षेत्रात असते. यावेळी स्वसंरक्षणासाठी काठी वगळता कोणतेही शस्त्र नसल्याने महिला वनरक्षक भीतीदायक वातावरणात गस्त घालतात. गेल्या महिन्यात हरसूल येथे राखीव वनक्षेत्रात साग लाकूड तस्करांवर कारवाई करणार्‍या वन पथकावर हल्ला झाला होता. या पथकात महिला सेवकांचाही समावेश होता. यासह दुर्गम भागातील वनक्षेत्र मोठे असल्याने महिला वनरक्षकांना अनेकदा एकट्यानेही दूरवर जावे लागते.

यावेळी गस्त घालत असताना कोणता प्रसंग घडेल याची शाश्वती नसते. म्हणून स्वसंरक्षणासाठी मिरचीची पूड असलेला स्प्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम वनविभागातील 126 बीटमध्ये एकूण 160 वनरक्षक कार्यरत आहेत. यात महिलांची संख्या मोठी आहे. 100 स्प्रेची खरेदी करण्यात आली असून सर्व महिला वनरक्षकांना स्प्रे देण्यात आले आहेत. यामुळे अचानक होणार्‍या हल्ल्यात बचाव करण्यासह गैरवर्तन होत असल्यास स्वसंरक्षण करणे सोपे होणार असल्याचा विश्वास महिला वनरक्षकांनी व्यक्त केला आहे.

महिला वनरक्षकांची सुरक्षा महत्त्वाची
वनविभागात कार्यरत महिलांसह सर्वच वनरक्षकांना दुर्गम भागत, जंगलात गस्त घालावी लागते. अनेकदा महिला वनरक्षक असुरक्षित असल्याची भावना रात्रीच्या गस्तीवेळी व्यक्त होत होती. यामुळे मिरचीची पूड असलेला स्प्रे महिला वनरक्षकांना देण्याचा निर्यण घेतला. यातून त्यांना बचाव करणे शक्य होणार आहे. महिला वनरक्षकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने हा निर्णय घेतला.
– शिवाजी फुले, उपवनसंरक्षक, पश्चिम वनविभाग

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com