चांदोरी येथील ‘रँचो’ने बनवली विना गियरची इलेक्ट्रिक कार
स्थानिक बातम्या

चांदोरी येथील ‘रँचो’ने बनवली विना गियरची इलेक्ट्रिक कार

Gokul Pawar

Gokul Pawar

सिन्नर : चांदोरी येथील भूमीपुत्र प्रतीक एकनाथ जाधव व सध्या सोनारी (ता. सिन्नर) येथे राहत असलेल्या व या युवकाने अवघ्या एक लाखात विद्युत उर्जेने बॅटरी चार्ज करून 100 किलोमीटर पर्यंत चालणारी कार तयार केली आहे.

प्रतीक याने २०१४-१५ मध्ये १५ वी उत्तीर्ण होत, औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातून फिटर विभागातून दोन वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो अंबड येथील महिंद्रा कंपनीत शिकाऊ उमेद्वार म्हणून गुणवत्ता नियंत्रक पदावर काम करीत होता. हे काम करीत असताना त्याने विविध विद्युत यंत्र बघितले. या तांत्रिक संशोधनाच्या कामातून त्याने प्रेरणा घेत सप्टेंबर 2016 मध्ये विद्युत कार बनविण्याचे काम प्रतिकने हाती घेतले. कार बनविण्यासाठी मोठा खर्च येणार होता.

प्रतीक हा शेतकरी कुटुंबातील असल्याने व वडील एकनाथ जाधव हे देखील औद्योगिक वसाहतीत राजेश्वरी कारखान्यात नोकरीला होते. त्यामुळे हे कुटुंब सोनारी (ता. सिन्नर) येथे स्थायिक झाले होते. काही कारणास्तव वडील नोकरीला असलेली कंपनी बंद पडली. त्यानंतर प्रतीकने सिन्नर येथील एका कंपनीत नोकरी मिळवली. त्यामुळे बेरोजगारीचे संकट टळले. याच पैशातून त्याने घर प्रपंचाबरोबरच विद्युत कारचे स्पेअर पार्ट विकत घेण्यास सुरुवात केली. ‘जुनं ते सोनं’ या न्यायाने त्याने बाजारातील वापरबाह्य झालेले टायर, शीट, बॅटरी अशा विविध आवश्यक वस्तू खरेदी केल्या आणि टाकाऊपासून टिकाऊ अशा विद्युत कारची निर्मिती केली. दुचाकीला वापरल्या जाणार्‍या जुन्या स्पेअरचा तसेच जे स्पेअर मिळाले नाही ते त्याने स्वतःच बनवले.

वडील एकनाथ जाधव त्याच्या मदतीला उभे राहिले आणि तीन वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर त्याचे विद्युत कार बनविण्याचे स्वप्न साकार झाले. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याचेसह त्याच्या वडिलांचाही सत्कार करण्यात आला. सदरची कार कुठल्याही प्रकारचे प्रदूषण न करणारी असून या कारला ‘एक्सेल द पॉवर’ असे नाव देण्यात आले आहे. 48 व्होल्ट व 100 अ‍ॅम्पीअरच्या दोन बॅटर्‍या सहा तास चार्जिंग केल्यानंतर ही कार 100 किलोमीटरचे अंतर आरामात कापू शकते. 600 किलो पर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता या कारमध्ये असल्याचे प्रतीकने केला आहे.

विशेष म्हणजे विना गियरची आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात नव्याने विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा वापर या कारमध्ये करण्यात आला आहे. भविष्यात या कारला सोलर पॅनल बसवून सौरऊर्जेचा वापर आणि सोलार कार म्हणून विकसित करण्याचा मानस असल्याचे प्रतीक जाधव याने म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com